सिंधुदुर्ग | राज्यात भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेकडून त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले. यानंतर नारायण राणे यांना अटक झाली आणि रात्री उशिरा त्यांना जामीनही मिळाला आहे.
नारायण राणे यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईमुळे भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. यानंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नाशिक आणि उत्तर प्रदेशमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी नारायण राणे यांच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव टाकला ,असा आरोप करत भाजप नेते आशिष शेलार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
भाजपच्या या मागणीनंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलंय. भाजपकडे सध्या ईडी आणि सीबीआयसारखे दोन चंगू मंगू आहेत. भाजपला जे लोक विरोध करतील त्यांच्यावर हे शुक्लकाष्ट लावायचं हीच त्यांची रणनिती आहे. त्यांनी कितीही चौकशा लावू द्या. महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पुर्ण करेल. तसेच भाजपला जे काही करायचं आहे, त्यांनी करावं कोणीही त्यांचे हात बांधले नाहीत, असं राऊत म्हणाले.
नारायण राणे यांची यात्रा सिंधुदुर्गात येतानाच अपशकून झाला. यात्रेचा शेवट कसा होईल हे जनतेला माहित आहे. जेवताना अटक करण्यात आली तेव्हा राणे काय जेवत होते पाहिलं तर राणे नाटकं करत होते. ज्यांनी शिवसेनेचा शेवट करू, अशी भाषा केली आहे. त्यांचं कसं विसर्जन झालं आहे. सध्याच्या राजकारणात भरपूर उदाहरणे आहेत, असं म्हणत त्यांनी भाजपसह राणेंवर निशाणा साधला.
Post a Comment