राज्यातील ‘या’ 5 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

 


मुंबई | जुलैच्या अखेरीस पावसाने राज्यात थैमान घातलं होतं. कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि ठाणे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली. मागील आठवड्यात पुन्हा मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. त्यातच आता राज्यातील 5 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील पाच दिवस पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विदर्भात दडी मारली होती. मात्र, आता मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

येत्या पाच दिवस राज्यात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. 29 ऑगस्टपर्यंत पूर्व विदर्भातील काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे.

दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात राज्यात पाऊस पडला आहे. राज्यात काही भागात अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे. पावसाने उघडीप घेतल्यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाला पुन्हा सुरूवात होईल, असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post