'सत्ताधारी, विरोधक दुसऱ्याच गोंधळात व्यग्र' : राज्यातील शेतकरी भडकले

 


अहमदनगर | राज्यात अचानकपणे टोमॅटोचे भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. करोनाच्या कठीण काळातही मोठे कष्ट आणि खर्च करून पिकविलेला माल भाव नसल्याने रस्त्यावर ओतण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामध्ये सरकारने तातडीने लक्ष घालून उपाय करावेत, अन्यथा सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या दारात टोमॅटो आणून टाकू, असा इशारा शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.


गेल्या काही दिवसांपासून अचानकपणे राज्यात टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद या भागात टोमॅटोचे जादा उत्पादन होते. सर्वच ठिकाणी आवक वाढली असून भाव मात्र कोसळले आहेत. टोमॅटोच्या २० किलो कॅरेट्ला ६० ते १०० रुपये दर म्हणजे प्रति किलो ३ ते ५ रुपये भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. टोमॅटो लागवडीसाठी आलेला खर्च तसेच वाहतूक खर्चही निघत नाही.
यावर्षी टोमॅटो उत्पादक भागात पावसाने खंड दिला होता. याकाळात पावसाने होणारे नुकसान टळून टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे देशांतर्गत टोमॅटोची मागणी घटली आहे. गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तान सीमा बंद असल्याने आखाती देशात टोमॅटोच्या निर्यातीला मर्यादा आल्या आहेत. यासर्वांचा परिणाम होऊन भाव कोसळल्याचे सांगण्यात येते.

यासंबंधी बोलताना किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले म्हणाले, ‘अचानक भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, सरकार आणि विरोधक दुसऱ्याच गोंधळात व्यग्र आहेत. त्यांनी तो गोंधळ थांबवून ताबडतोब या प्रश्नात लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. कोल्ड स्टोअरेज, प्रक्रिया उद्योग यांना चालना देऊन टोमॅटोला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे धोरण घेतले पाहिजे. लाखो रुपये खर्चून पिकविलेला टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे.'

'राजकारणी आपले मानअपमान आणि एकमेकांवर चिखलफेक करण्यात दंग आहेत. सरकारने हा खेळखंडोबा थांबवावा. सहकार विभाग, कृषी विभाग, पणन विभाग यांनी एकत्र येऊन धोरण घ्यावे. कर्ज, अनुदान, मालाचे जतन यासंबंधी निर्णय घ्यावेत, अशी आमची मागणी आहे. अन्यथा हाच टोमॅटो सत्ताधारी मंत्र्यांच्या दारात आणि विरोधकांच्या दारात नेऊन टाकण्यात येईल,’ असा इशाराही नवले यांनी दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post