उस्मानाबाद | राजकारणात टीका टीपण्णी होत असते. राजकारण म्हटलं की भांडण आलंच. या भांडणाचं रूपांतर हे मोठ्या समस्येत होवू नये यासाठी सर्व लक्ष देत असतात. पण काही वेळा राजकारणात टीका आणि भांडणं ही खूप वेगळ्या वळणावर जातात. अन् यानंतर दगडफेकीसारखे प्रकार घडतात.
उस्मानाबाद जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदित्य गोरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या गाव संपर्क अभियानाला जात असताना हा प्रकार घडला आहे. आपल्या सहकाऱ्यांसोबत आदित्य गोरे हे दौऱ्यावर असताना हा वाईट प्रकार घडल्याने सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला आहे. या घटनेत गाडीच्या काचा फुटल्या आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम तालुक्यातील पारडी फाटा येथे हा प्रकार घडला आहे. ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने सर्वत्र चिंता पसरली आहे. राजकीय वादामुळे, अंतर्गत गटबाजीमुळे की लुटण्याच्या उद्देशाने ही घटना घडली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. या प्रकरणी वाशी पोलिस स्थानकात अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आदित्य गोरे हे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जीवनराव गोरे यांचे सुपुत्र आहेत. आपल्या जनसंपर्कासाठी आदित्य गोरे हा चेहरा ओळखला जातो. राष्ट्रवादीच्या युवकांच्या फळीतील महत्वाचे नेते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला बळकटी देण्यासाठी त्यांचा हा दौरा चालू आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय असल्याचं बोललं जात आहे.
Post a Comment