“राज्यपाल महोदय आठवा महिना लागला, निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार?”

  


 वेब टीम

मुंबई | सरकारने 12 नावांची शिफारस करुन आता आठवा महिना लागला. राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार आहे? हे राजभवनातील सुईणीने एकदा स्पष्ट करावं, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केली आहे.

12 नामनियुक्त आमदारांच्या नेमणुका फक्त राजकीय कारणांसाठीच रखडवून ठेवल्या आहेत हे राजभवनातले शेंबडे पोरही सांगेल. मुंबईच्या हायकोर्टानेही राज्यपालांची सौम्य, सभ्य भाषेत टोपी उडवून विचारलं की, निर्णयासाठी आठ महिने घेणं हे जरा जास्तच झालं. निर्णय घेणं तर राज्यपालांवर बंधनकारक आहेच!’ तरीही घटनेचे कोणतेही बंधन पाळायला राज्यपाल तयार नाहीत, अशी टीका राऊतांनी केली.

राज्यपालांनी घटनेची चौकट मोडली तर त्यांची इज्जत राहणार नाही आणि त्यांच्या इज्जतीशी सध्या त्यांचेच लोक खेळ करीत आहेत. 12 आमदारांच्या नियुक्त्या रखडवून भाजप आणि राज्यपाल स्वतःचंच हसे करून घेत आहेत. हा त्यांचा रडीचा डाव आहे व वैफल्याचे झटके आहेत. जनतेच्या मनातून त्यांचे स्थान घसरले आहेच. पण आता हायकोर्ट आणि शरद पवारांसारखे मोठे नेतेही खुलेआम टपल्या आणि थपडा मारू लागले आहेत, असं राऊत म्हणालेत.

आमदारांच्या नियुक्त्यांबाबत सरकारने आग्रह धरायला हवा, म्हणजे नक्की काय करायला हवं? राज्यपाल महोदयांनी पदाची शान राखून हे वक्तव्य अजिबात केलेलं नाही. राज्यपालांकडे आग्रह धरायचा म्हणजे नेमके काय करावं? त्यांच्या राजभवनात जमून टाळ्या, थाळ्या, घंटा वाजवून राज्यपालांचे लक्ष याप्रश्नी वेधून घ्यायचं, की आणखी काही करायचं?, असं राऊत म्हणाले.

 

 


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post