लसीचे दोन डोस घेतल्यास राज्यात फिरण्याची मुभा; दुकानांची वेळ वाढवण्यावर मुख्यमंत्री घेणार निर्णयमाय वेब टीम 

मुंबई राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी तिसरी लाट येण्याची भीती कायम आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. जे नियम सध्या लागू आहेत ते यापुढे तसेच कायम राहतील, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे. मात्र दोन डोस घेतलेल्या नागरिकांना राज्यात संचाराची मुभा देण्यावर सरकारचा विचार सुरू आहे, असे ते म्हणाले.

राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा झाली. पण जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा निर्णय झाला. ज्या व्यापाऱ्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांनी दुकाने खुली ठेवण्याबाबत मागणी केली होती. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांमध्ये निर्णय घेणार आहेत. राज्यात कोरोनाबाधितांची ३ आठवड्यांत रुग्णसंख्या स्थिर आहे. पण १० जिल्ह्यांमध्ये ९२ टक्के रुग्ण आहे. त्यामुळे स्तर ३ मध्ये अनेक जिल्हे आहेत. त्यामुळे राज्यात निर्बंध शिथिल करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे मंत्री टोपे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७ जुलै रोजी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्यानंतर ९ जुलै रोजी राज्य आपत्कालिन विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. निर्बंध शिथिल करण्याबाबत दोन बैठकांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य टास्क फोर्सशी चर्चा करून अहवाल मागितला होता. दरम्यान, राज्य सरकारने कोणतेही निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी मुंबईतील लोकल सेवा खुली करण्याचा निर्णयही बारगळला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post