HDFC बँकेच्या शेअर होल्डर्ससाठी महत्वाची बातमी; 18 जूनला मोठया घोषणेची शक्यता


माय वेब टीम 

मुंबई-  देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणाऱ्या HDFC बँकेच्या संचालक मंडळाची 18 जूनला महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. यापैकी डिव्हीडंटच्या घोषणेकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. तसे झाल्यास HDFC बँकेच्या समभागधारकांना मोठा फायदा होऊ शकतो. 

एखाद्या कंपनीला खूप नफा झाल्यास त्याचा फायदा डिव्हिडंटच्या स्वरुपात समभागधारकांना दिला जातो. समभागधारकांना डिव्हिडंट देणे अनिवार्य नसते. हा निर्णय सर्वस्वी कंपनीच्या संचालक मंडळावर अवलंबून असतो. त्यामुळे आता HDFC बँकेच्या समभागधारकांना हा लाभ मिळणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

क्रेडिट कार्डात बदल होणार

बँकेची धोरणे आणि रचनात्मक बदलांसह क्रेडिट कार्डांमध्येही मोठे बदल होणार आहेत. नव्या तंत्रज्ञानाला अनुकूल अशी क्रेडिट कार्ड ग्राहकांना देण्याचा विचार एचडीएफसी बँक करत आहे. त्यासाठी क्रेडिट कार्ड विभागाचा कारभार फिनटेक या कंपनीकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डाच्या एन्ड टू एन्ड सुरक्षेत वाढ होणार आहे. सध्याच्या घडीला फिनटेक हे ऑनलाईन बँकिंग आणि क्रेडिट कार्डासाठी चांगले व्यासपीठ मानले जाते. त्यामुळेच एचडीएफसी बँकेकडून त्यांच्या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार असल्याचे सांगितले जाते.

यंदाच्या वर्षात TCS कंपनीने प्रति समभाग 15 रुपये डिव्हिडंट देण्याची घोषणा केली होती. तर टेक महिंद्राकडून आपल्या शेअरहोल्डर्सना प्रति समभाग 30 रुपयांचा डिव्हिडंट मिळणार आहे. तर विप्रोकडून प्रतिसमभाग एका रुपयाच्या डिव्हिडंटची घोषणा करण्यात आली होती. याशिवाय, HCL कंपनी आणि आयसीआयसीआय बँकेने प्रतिसमभाग दोन रुपयांचा डिव्हिडंट देण्याची घोषणा केली होती.

HDFC बँकेत मोठ्या बदलांच्या हालचाली

देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेत मोठे धोरणात्मक बदल होणार आहेत. याचा प्रभाव HDFC बँकेचे ग्राहक आणि संबंधित गोष्टींवर पडणार आहे. या नव्या बदलांमुळे एचडीएफसी बँकेची स्थिती सुधारण्याबरोबरच ग्राहकांनाही नवे फायदे मिळणार असल्याचे सुतोवाच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी जगदीशन यांनी केले होते.

ग्राहकांना काय मिळणार ?

बँकेतील नव्या बदलांचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. नव्या रचनेमुळे कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी वेगाने होईल. ज्याचा फायदा देशभरातील बँकेच्या ग्राहकांना मिळेल, असा विश्वास शशी जगदीशन यांनी व्यक्त केला.

प्रोजेक्ट फ्युचर रेडी

एचडीएफसी बँक नवीन गुणवत्ता आणि तंत्रज्ञान व डिजिटल या गोष्टींच्या आधारे विकासाच्या नव्या वाटा शोधत आहे. जेणेकरून आगामी काळात उपलब्ध संधींचा पूर्णपणे लाभ उठवता येणे शक्य होईल. या उपक्रमाला प्रोजेक्ट फ्युचर रेडी असे नाव देण्यात आले आहे. भांडवली बाजाराचे मूल्य पाहता एचडीएफसी ही आजघडीला देशातील सर्वात मोठी खासगी बँक आहे. सध्या देशभरात बँकेचे 1.16 लाख ग्राहक आहेत.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post