मोठ्या बहिणीचा पाठलाग करणाऱ्याला धाकटीने रस्त्यात अडवून झोडपून काढले


माय वेब टीम

शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेची वेळ. स्थळ सूतगिरणी चौक. नेहमीप्रमाणे जो तो ज्याच्या कामात होता. वाहतुकीची वर्दळही बऱ्यापैकी सुरू होती. तेवढ्यात दोन टवाळखोर, रोडरोमिओंनी एका तरुणीला रोखले. तिची छेड काढू लागले. त्याबद्दल ती त्यांना जाब विचारत असतानाच तिची धाकटी बहीण तेथे दाखल झाली आणि तिने एका क्षणात त्यातील एका टवाळखोराला चोप देण्यास सुरुवात केली. २५ वर्षे वयाच्या रेणुकाने (नाव बदलले आहे) सुमारे पंधरा मिनिटे त्या रोमिओला धो-धो धुतले, अक्षरश: झोडपून काढले. तिचा रुद्रावतार पाहून एका टवाळखोराने दुचाकी तेथेच सोडून पोबारा केला. हा प्रकार पाहत असलेल्या महिलांनी रेणुका व तिच्या बहिणीच्या धाडसाचे कौतुक केले. महिला, तरुणींमधील भीती नष्ट व्हावी, त्यांनी स्वसंरक्षणाचे सामर्थ्य दाखवून द्यावे या उद्देशाने दिव्य मराठीने रातरागिणी उपक्रम सुरू केला आहे. त्याचा परिणाम होत असल्याचे घटनेतून समोर आले.

तरुणींचा पाठलाग करणे, एकटक पाहत राहणे, मुलींना पाहून अश्लील घटना वारंवार घडतात. बहुतांश घटनांमध्ये महिला-तरुणी दुर्लक्ष करून पुढे जातात आणि अशा टवाळखोरांचा विश्वास वाढतो आणि क्रमाने अशांची संख्यादेखील वाढते. शुक्रवारी रेणुकाची ३३ वर्षीय विवाहित बहीण साक्षी (नाव बदलले आहे) लहान भावासोबत औरंगपुरा परिसरात गेली होती. तेथून भावाचा गारखेडा परिसरात कोचिंग क्लास असल्याने त्याला तिकडे सोडण्यासाठी ती औरंगपुऱ्यातून गारखेड्याकडे निघाली. तेव्हा औरंगपुऱ्यातून तिच्या मागे दोन टवाळखोरांनी तिचा पाठलाग सुरू केला.

हा प्रकार साक्षीच्या लक्षात आला. मात्र थोड्या वेळाने थांबतील म्हणून तिने दुर्लक्ष केले. मात्र, दर्गा रस्त्यापर्यंत त्यांनी पाठलाग सुरू केला. त्यांची हिंमत वाढली होती. त्यांनी अश्लील हातवारे करणे, अश्लील शब्द वापरले सुरू केले. दरम्यान, साक्षीने एका ठिकाणी थांबून रेणुकाला हा प्रकार कळवला होता. रेणुकाने तिला न थांबता पुढे जात राहण्यास सांगितले. साक्षी सूतगिरणी चौकात पोहोचली तरीही ते टवाळखोर थांबले नव्हते. साक्षीची सहनशक्ती संपल्याने ती सूतगिरणी चौकात थांबली व त्यांना जाब विचारला. पण टवाळखोरांनी हद्द गाठली होती.

साक्षीने त्यांना कडक शब्दांत जाब विचारणे सुरू केले. तेवढ्यात रेणुका तेथे पोहोचली. हे का ते दोघे? एवढेच तिने विचारले आणि दोन्ही हाताने एकाला बाजूला ओढून त्याची धुलाई सुरू केली. लाथा-बुक्क्यांचा त्यांच्यावर वर्षाव सुरू केला. ते पाहून दुसरा टवाळखोर पळून गेला. दरम्यान, तोपर्यंत नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली. रेणुकाचा दुर्गावतार पाहून लोक चकित आणि आनंदित झाले होते. काही वेळापूर्वी भररस्त्यावर छेड काढणारा रेणुका व तिच्या बहिणीच्या हातपाया पडून, गयावया करत माफी मागत होता. कशीबशी स्वतःची सुटका करून तो पळाला. दरम्यान, अर्धा तास भररस्त्यावर घडलेल्या घटनेची काही अंतरावर असलेल्या जवाहरनगर पोलिसांना कल्पनादेखील नव्हती. या घटनेची पोलिसांत नोंद झाली नाही.

ज्यांना जी भाषा कळते त्याच भाषेत समजावून सांगावे लागते
पंचवीस वर्षीय रेणुका सध्या पुण्याला हवाई सुंदरी होण्याचे प्रशिक्षण घेत आहे. शिक्षणासाठी पुण्याला जाण्याआधी साधारण अडीच वर्षांपूर्वी ती मैत्रिणीसोबत प्रोझोन मॉलला गेली होती. तेथे एका रोडरोमिओने तिच्या मैत्रिणीची छेड काढली. तेव्हादेखील तिने त्याची भररस्त्यावर धुलाई केली होती. ज्यांना ज्या भाषेत समजते त्याच भाषेत समजून सांगावे लागते, असे रेणुकाने सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post