अमेरिकन कंपन्या भारतीय कायद्यांचे उल्लंघन करतायत; केंद्रीय मंत्र्याची टीका


माय वेब टीम 

नवी दिल्ली - केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी भारतातील दिग्गज अमेरिकन ई-कॉमर्स कंपन्यांन्या ग्राहकांच्या हितासाठी बनविलेल्या नियमांचे पालन न करता त्याचे उल्लंघन करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांच्यात गर्विष्ठपणा असल्याचा आणि स्थानिक कायद्यांचा भंग केल्याचा आरोप केला आहे. भारतीय बाजारपेठेत आम्ही सर्वांचे स्वागत करतो पण त्यांना देशातील नियम व कायद्यांमध्येच काम करावेच लागेल असा इशारा त्यांनी दिला. यावेळी गोयल यांनी अ‍ॅमेझॉन किंवा वॉलमार्ट आयनसीच्या फ्लिपकार्टचे नाव घेता ही टीका केली आहे. 

रविवारी एका वेबिनार मध्ये बोलताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ई-कॉमर्स कंपन्यांवर कडक शब्दात टीका केली. “भारतीय बाजारपेठ प्रचंड मोठी आहे आणि आम्ही सर्वांचे स्वागत करतो. त्यांना देशातील नियम व कायद्यांनुसारच काम करावे लागेल” असे गोयल यांनी म्हटले. यासह कंपन्यांना कोणत्याही परिस्थितीत नियम आणि कायदे मान्य करावे लागतील असे त्यांनी सांगितले. परदेशी कंपन्यांना मार्गदर्शक सूचना पाळण्यासाठी कडक सूचना त्यांनी यावेळी केल्या. 

पीयूष गोयल यांनी ई-कॉमर्स कंपन्यांवर टीका करताना म्हटले की, “दुर्दैवाने अनेक मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या भारतात आल्या आहेत आणि त्यांनी देशाच्या कायद्यांचा अनेक प्रकारे भंग केला आहे. या मोठ्या विशेषत: अमेरिकन कंपन्यांशी मी संबंधित आहे. त्यांच्या प्रगतीमुळे मला आनंद झाला आहे. पण भारतीय बाजारपेठ काबीज करण्याचा त्यांचा प्रयत्न आणि भारतीय ग्राहकांबद्दल त्यांचा दृष्टीकोन योग्य नाही” असे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post