म्हणून कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका : मुख्यमंत्री

 


माय वेब टीम

मुंबई - कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका ओळखून आवश्यक ती औषधे, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील याची खबरदारी घ्या, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिल्या. सीकरणावर भर, सिरो सर्व्हेक्षण आणि नियम- निर्बंधांचे पालन करणे गरजेचे आहे. जर गर्दी वाढली आणि कोरोनाचे नियम पाळले नाहीत तर एक- दोन महिन्यात तिसर्‍या लाटेलाही सामोरे जावे लागेल, अशी भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.  


मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना व तयारीबाबत टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत चर्चा करून आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जर्‍हाड, प्रधान सचिव वित्त राजगोपाल देवरा, प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदिप व्यास, डॉ. रामास्वामी, डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. तात्याराव लहाने यांची उपस्थिती होती.


मुख्यमंत्री म्हणाले, पहिल्या लाटेच्या वेळेस आरोग्यविषयक सेवा- सुविधांची कमी होती. नंतर त्यात आपण वाढ करीत गेलो. दुसर्‍या लाटेने बरेच काही शिकविले आहे. ही लाट ओसरत असून त्यातील अनुभवातून आपल्याला आवश्यक ती औषधे, आरोग्य सुविधा, बेड्स, ऑक्सिजन उपलब्धता या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावे लागेल. 


लसीकरण हा या लढाईत महत्वाचा भाग असून, राज्यातील नागरिकांचे लसीकरण वेगाने होण्याची गरज आहे. येत्या ऑगस्ट- सप्टेंबरपासून देशाला 42 कोटी लसी मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने होईल अशी अपेक्षा आहे. सर्व सबंधित यंत्रणांनी समन्वय गरजेचा आहे. या सर्व बाबी झाल्या तरी आरोग्य विषयक नियमांचे पालन करणे, मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे हे अत्यावश्यकच राहणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post