'कोरोना लस, अफवांना बळी पडू नका...'



माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली- करोनावरील कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींना परवानगी देण्यात आल्यानंतर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. विरोधकांकडून यावरून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम स्वतः लस घ्यावी, अशी मागणीही विरोधकांकडून करण्यात आली होती. करोना लसीवरून शंका उपस्थित करणाऱ्या अफवांवर भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांनाही नामोल्लेख टाळत प्रत्युत्तर दिलं.



करोनाच्या लसींना परवानगी देण्यात आल्यानंतर विरोधकांनी लसीच्या गुणवत्तेवर संशय व्यक्त केला होता. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदींनी सर्वात आधी करोनाची लस घ्यावी, अशी मागणीही केली होती. त्यामुळे यावरून वादंग निर्माण झालं होतं. त्याचबरोबर लसीबद्दल सामान्यांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आहे.


पंतप्रधान मोदी यांनी सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करत विरोधकांना अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला. मोदी म्हणाले,”आपल्या शास्त्रज्ञांना आणि तज्ज्ञांना जेव्हा मेड इन इंडिया लसीच्या सुरक्षा आणि परिणामकारकतेबद्दल खात्री झाली, तेव्हाच त्यांनी या लसींच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली. त्यामुळे देशवासीयांनी कोणत्याही भूलथापा, अफवा आणि चुकीच्या प्रचारापासून सावध राहावं. भारतातील लस निमिर्ती करणारे शास्त्रज्ञ, आपली वैद्यकीय प्रणाली आणि भारतातील प्रक्रियेवर संपूर्ण जगाला विश्वास आहे. आपण हा विश्वास आपल्या पूर्वीच्या कामांपासून संपादीत केला आहे,” असं सांगत मोदी यांनी लसीच्या सुरक्षिततेबद्दल भारतीयांना आश्वस्त केलं.



“प्रत्येक भारतीयाला या गोष्टीचा अभिमान वाटेल की, जगातील ६० टक्क्यांच्या जवळपास लहान मुलांना ज्या जीवनरक्षक डोस दिले जातात, ते भारतात तयार होतात. भारतातील कठीण शास्त्रीय प्रक्रियातून ते तयार होतात. भारतीय लसी परदेशी लसींच्या तुलनेत खूप स्वस्त आहे आणि त्याचा उपयोग करणंही सोप्पं आहे. विदेशात काही लसी अशा आहेत, ज्यांचा एक डोस ५ हजार रुपयांना मिळतो आणि त्यांना उणे ७० डिग्री तापमान असलेल्या फ्रिजमध्ये ठेवावं लागतं,” असंही मोदी म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post