योगी आदित्यनाथ उद्या मुंबईत, बॉलिवूड उत्तर प्रदेशात नेण्यासाठी पहिली बैठक




माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. योगी आदित्यनाथ बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये जाणार आहेत. महत्वाचं म्हणजे यावेळी योगी आदित्यनाथ काही बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासंबंधी चर्चा करणार आहेत.

१ डिसेंबरच्या रात्री योगी आदित्यनाथ लखनऊहून मुंबईसाठी रवाना होतील. २ डिसेंबरला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा कार्यक्रम संपल्यानंतर योगी आदित्यनाथ उद्योजक आणि बॉलिवूड सेलिब्रेटींना उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करतील. या बैठकीत दिग्दर्शक सुभाष घई, बोनी कपूर, टी सीरिजचे भूषण कुमार, झी स्टुडिओचे जतीन सेठी, नीरज पाठक, रणदीप हुडा, तिगमांशू धुलिया, जिमी शेरगिल, तरण आदर्श, कोमल नाहता आणि राजकुमार संतोषी उपस्थित राहतील अशी माहिती अधिकाऱ्याने फ्री प्रेस जर्नलला दिली आहे.

सप्टेंबर महिन्यात योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या फिल्म सिटीची घोषणा केली होती. देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज असून आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचं ते म्हणाले होते. अनेक सेलिब्रेटींनी योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. योगी आदित्यनाथ यांनी यासंबंधी लखनऊतही बैठक घेतली होती.


योगी आदित्यनाथ यांनी फिल्मसिटी उभारण्यासाठी नोएडा जवळील यमुना एक्स्प्रेसवेवर असणारी १००० एकर जागाही राखून ठेवली आहे. ही फिल्मसिटी बॉलिवूडपेक्षाही मोठी असेल असं योगी आदित्यनाथ यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली होती. “बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

दरम्यान योगी आदित्यनाथ यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत एन चंद्रशेखर, बाबा कल्याणी, हिरानंदानी यांचा समावेश आहेत. ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे.

“महाराष्ट्रातील गुंतवणूक उत्तर प्रदेशात नेण्याचा कुटील डाव”

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेतला असून शंका व्यक्त केली आहे. “उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक नेण्याचा त्यांचा डाव आहे. उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांना धमकावण्याचा प्रयत्न यातून केला जाऊ शकतो. त्यांचा हा कुटील डाव वेळीच ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने राज्यातील उद्योगक तसेच बॉलिवूडच्या सुरक्षेची काळजी घ्यावी,” असं आवाहन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे.

सावंत म्हणाले, “केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उद्योजक, बॉलिवूड यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र मागील काही महिन्यापासून केले जात असल्याचे उघड झालं आहे. एनसीबीच्या माध्यमातून बॉलिवूडला बदनाम करण्याचे प्रयत्न सुशांतसिंह प्रकरणापासून कसं केलं जात आहेत हेही स्पष्ट झालं आहे. मोदी सरकारच्या मदतीने महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या मोहिमेत योगी आदित्यनाथ यांचाही पुढाकार राहिलेला आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न २०१४ पासूनच होतो आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र असेच षडयंत्र करुन गुजरातला नेलं गेलं. आता बॉलिवूडचं महत्व कमी करुन उत्तर प्रदेशमध्ये दुसरा चित्रपट उद्योग निर्माण करण्याचा डाव आहे. त्यांच्या मुंबई भेटीत ते अशीच भीती दाखवून महाराष्ट्रातील गुंतवणूक व बॉलिवूड उत्तर प्रदेशला नेण्यासाठी घाट घालतील. महाराष्ट्राची अधोगती करण्याचा त्यांचा कुहेतू लक्षात घेऊन मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच महाविकास आघाडी सरकारने उद्योगपती व बॉलिवूडच्या पाठीशी खंबरपणे उभे राहण्याची गरज आहे.”



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post