पाणी नेमकं कुठं मुरलं? चौकशी होणार; फडणवीसांना ठाकरे सरकारचा झटका



 माय अहमदनगर वेब टीम

मुंबई: 'महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलक्षेत्रात भरीव काम झाले. अनेक प्रकल्प मार्गी लागले', असे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच केले असताना फडणवीस सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचा निर्णय राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजनेचा मूळ उद्देश भूजल स्तर वाढवण्याचा होता. या योजनेवर सुमारे ९ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊनही पाण्याची अपेक्षित पातळी मात्र वाढली नाही. कॅगच्या अहवालातही या योजनेवर ताशेरे ओढण्यात आले होते. त्या आधारावरच राज्य मंत्रिमंडळाने या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपसाठी खूप मोठा दणका मानला जात आहे.

कॅगच्या अहवालाच्या आधारावर चौकशी

कॅगने ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या वर्षातील आपल्या अहवालात जलयुक्त शिवारच्या कामांचा दर्जा, खर्च, परिणाम यावरून उपस्थित केलेल्या टीकात्मक मुद्द्यांचा विचार करून जलयुक्त शिवार अभियानाची खुली चौकशी (open enquiry) करण्याचे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले. यासंदर्भात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अभियानाच्या अनुषंगाने चर्चा झाली तसेच कॅगचा अहवाल आणि सरकारकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचा विचार करून खुली चौकशी करावी यावर एकमताने निर्णय घेण्यात आला, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post