महाराष्ट्रातून कुणीच काही ओढून नेऊ शकत नाही!; CM ठाकरेंचा नेम योगींवर?

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई : महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही महाराष्ट्राचे आकर्षण कायम आहे, असे सांगतानाच राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

वेब माध्यमातून या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई, आयएमसीचे अध्यक्ष राजीव पोद्दार यांच्यासह इतर उद्योजक उपस्थित होते. यावेळी ‘मिशन एंगेज’ या पुस्तिकेचे तसेच डिजिटल आर्ट या डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. ' मॅग्नेटिक महाराष्ट्र 'साठी इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स पुढाकार घेत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मॅग्नेटिक या शब्दात मोठी ताकद आहे. महाराष्ट्राला एक इतिहास आहे. महाराष्ट्र एक सर्वार्थाने वेगळे राज्य आहे. इथे वेगळे संस्कार आहेत. त्यामुळे येथे येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाही. स्पर्धेला आम्ही घाबरत नाही. पण कुणी ओढून ताणून येथून काही घेऊन जाणार असेल, तर ते शक्य होणार नाही', असा इशारा यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव न घेता दिला.

महाराष्ट्रात नवीन गुंतवणूक येते आहे. इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्रातील या बदलाचे ११३ वर्षे जुने साक्षीदार आहे. त्यामुळेच तुम्हीच महाराष्ट्राचे ब्रँड अॅम्बेसेडर आहात. महाराष्ट्राच्या यशाची गाथा, गोष्टी तुम्हीच इतरांना सांगू शकता. कुठलीही अडचण असेल, तर ती दूर करण्यात सरकार तुमच्यासोबत असते. हे तुम्हाला सांगता येईल. यामुळे महाराष्ट्रात देशभरातून नव्हे परदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळेल. यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे दूत व्हावे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्सला ११३ वर्ष झाली आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जुन्या आठवणींना उजळा दिला. ते म्हणाले, इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्ससोबत जुने स्नेहबंध आहेत. यापूर्वी मुंबई आणि महाराष्ट्राचे व्हिजन काय असेल, याबाबत आपण चर्चा करत असू. पण आता हे स्वप्न आपल्याला सत्यात आणण्याची संधी मिळाली आहे. संस्थेने स्वातंत्र्यांच्या आधीचा काळही बघितला आहे. आता युग बदलले आहे. देशही बदलला आहे. देश विकासाच्या दिशेने पुढे जात आहे आणि याबरोबरच आपले नाते अधिक घट्ट झाले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post