कोरेगाव भीमामध्ये जमावबंदीमाय अहमदनगर वेब टीम

पुणे - पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाच्या ठिकाणी १ जानेवारी रोजी लाखो नागरिक येत असतात. पण यंदा करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा भीमा कोरेगाव सह अकरा गावामध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२१ पर्यंत नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. असे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आज काढले आहे. भीमा कोरेगावमध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.


पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभास १ जानेवारी रोजी दरवर्षी लाखोंचा जनसमुदाय येत असतो. मात्र यंदा करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वर्षभरामध्ये आपण सर्व सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले आहे. हे लक्षात घेऊन, भीमा कोरेगावच्या आसपास भागातील लोणीकंद, पेरणे, तुळापूर, बकोरी,वढू खुर्द, केसनंद, कोलवडी, डोंगरगाव, फुलगाव, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या गावांमध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२१ सकाळी सहा वाजेपर्यंत बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या कार्यक्रमाचे प्रसारण १ जानेवारीला दिवसभर दूरदर्शन आणि समाज माध्यमांवर केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातूनच अभिवादन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


दरम्यान ३१ डिसेंबरला होणाऱ्या एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद होणार नाही असं वाटत होतं. मात्र त्याचवेळी ही परिषद होईल अशी घोषणा करण्यात आली होती. तसंच यासाठी पुणे पोलिसांकडे परवानगीही मागितली होती. पुणे पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला देशभरातले अनुयायी येत असतात. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post