जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग ; २०० जणांविरोधात गुन्हामाय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर : महिला बचत गटांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्रातील महिला बचत गटातील महिलांना मायक्रो फायनान्स कंपनीकडून होत असलेल्या प्रचंड त्रासाबाबत तसेच पतसंस्था, बँकांकडील महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक होत काल, सोमवारी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली होती. बचत गटाचे कर्ज माफ करा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला होता.या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी ३० ऑक्टोबरला दिला आहे. या आदेशाचा भंग करत मनसेने मोर्चा काढला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी मनसे सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीप धोत्रे, सरचिटणीस अनिल चितळे, ज्ञानेश्वर गाडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, बाबासाहेब शिंदे व इतर दोनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन गोरे यांनी फिर्याद दिली आहे.मंडप व्यावसायिकांवर देखील गुन्हा दाखलवारंवार मागणी करूनही सार्वजनिक कार्यक्रमासाठी लोकांच्या उपस्थितीची मर्यादा वाढवून दिली जात नसल्याने मंडप व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे काल, सोमवारी उत्सव सोहळे संघर्ष समिती अहमदनगरच्या वतीने जिल्हा मंडप, लाईट, फ्लॉवर्स डेकोरेडर्स व्यवसायिक असोसिएशनच्या वतीने धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढत निदर्शने केली होती. मात्र हे धरणे आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधातही जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post