आर्थिक सुधारणांचा वेग कोरोनाकाळातही कायम

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - देशात सर्वत्र कोरोना महामारीचे संकट असताना देखील आर्थिक सुधारणांचा वेग कायम आहे. भविष्यातही आर्थिक  सुधारणांना अशीच चालना मिळेल, असा विश्‍वास  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय उद्योग परिसंघातर्फे (सीआयआय) आयोजित  राष्ट्रीय एमएनसी-2020 परिषदेत व्यक्त केला. कोरोनाकाळातही पंतप्रधानांनी अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी एकही संधी न गमावता समस्यांचे संधीत रूपांतर केले तसेच सुधारणांचा वेग कायम राहील, याची काळजी घेतली, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले.

आर्थिक क्षेत्राचे व्यावसायिकीकरण आणि निर्गुंतवणुकीवर भर देण्यात आला आहे. सर्व उद्योग संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि भारतीय कंपन्या, मोठे, मध्यम आणि लहान उद्योग यांना आपल्या व्यवसायाची फेररचना करण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे. भारत हे एक गुंतवणुकीसाठी आकर्षक केंद्र सुनिश्चित करण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीची धोरणे आखणे आवश्यक ठरणार आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत सरकारने जाहीर केलेल्या सुधारणांमुळे परकीय गुंतवणूकदारांसाठी अनेक क्षेत्रे मुक्त होणार आहेत. अणु ऊर्जा, अंतराळ यामध्येही परकीय गुंतवणूक केली जाऊ शकणार आहे. एमएनसींना सुलभतेने कार्यविस्तार करण्यासाठी सुविधा निर्माण करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचे सीतारामन म्हणाल्या.

सहा राज्यांत विशेष उत्पादन क्षेत्र

अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, आगामी काळाची गरज ओळखून सरकारने सहा राज्यांमध्ये काही उत्पादनांना समर्पित विशेष उत्पादन क्षेत्रांची स्थापना सुनिश्चित केली आहे. यामध्ये औषधनिर्मिती, वैद्यकीय उपकरणे आणि औषधांसाठी सर्वांत आवश्यक घटक ‘एपीआय’चेे  उत्पादन करण्यात येणार आहे. यासाठी प्रभावी संयुक्त एकल खिडकी तंत्रज्ञान या विशेष क्षेत्राचा एक हिस्सा राहील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post