फटाकेमुक्त दिवाळीच्या आवाहनानंतर तडतडताहेत नाराजीच्या लवंग्या

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - आरोग्यमंत्र्यांनी करोनासंसर्गाचा धोका लक्षात घेऊन ही दिवाळी फटाकेमुक्त साजरी करण्याचे आवाहन केले असले, तरीही फटाकेप्रेमींकडून नाराजीच्या लवंग्या तडतडत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांनी फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण व त्याचा करोना काळामध्ये फुफ्फुसांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधले आहे. केवळ करोनासंसर्ग रोखण्यासाठीच नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही फटाके वाजवून प्रदूषणामध्ये भर घालू नये, अन्यथा त्रास अधिक बळावेल, अशी भीती व्यक्त केली आहे. 

करोनासंसर्गाचा सर्वात पहिला घाला हा फुफ्फुसांवर असतो. फुफ्फुसांना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या श्वसनप्रक्रियेवर परिणाम होतो. करोनावर मात केलेल्या अनेक रुग्णांच्या फुफ्फुसावरील व्रण जात नाहीत. ते भरून येण्यासाठी दीर्घकाळ जावा लागतो. फटाक्यांप्रमाणे कोणत्याही ज्वलनशील पदार्थांमधून निघालेल्या धुरांमधून रुग्णांप्रमाणे इतर सर्वसामान्य व्यक्तीलाही श्वसनविकार होण्याची शक्यता असते. श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. अमित कोंडेश्वर यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, करोना संसर्ग असलेल्या अनेक रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नाहीत. या व्यक्तींकडून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता असते. तसेच त्यांच्यामधील लक्षणे फटाक्यांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे अधिक तीव्र होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. डॉ. व्ही. आर. नायर यांनी दिवाळीमध्ये थंडीचा जोर वाढल्यास श्वसनमार्गाच्या विविध प्रकारच्या तक्रारी निर्माण होण्याची शक्यता आहे. दमा वा इतर त्रास असलेल्या अनेक रुग्णांनी करोना काळामध्ये वैद्यकीय मदत टाळली आहे. त्यामुळे त्यांच्यातील आजाराची लक्षणे ही अधिक तीव्र झाली आहेत. रुग्णालयामध्ये संसर्ग होईल या भीतीने मदत न घेतलेल्या या रुग्णांचा जीव आपण धोक्यामध्ये टाकू शकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

टीबीच्या रुग्णांनाही धोका


टीबीचा आजार हा मुंबईमध्ये वाढत्या प्रमाणात असला, तरीही त्याला गांभीर्याने घेण्यात आलेले नाही. अनेक रुग्ण घरी वैद्यकीय उपचार घेतात. करोना रुग्णांमध्येही विलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सोसायट्यांमध्ये फोडण्यात येणाऱ्या फटाक्यातून निर्माण झालेल्या धुराचा त्रास त्यांनाही होऊ शकेल. श्वास घ्यायला त्रास होणे, दम लागणे, श्वास कोंडणे अशा तक्रारी अशा प्रकारच्या प्रदूषित वातावरणामध्ये राहिलेल्या व्यक्तींना भेडसावतात. त्यात करोना संसर्गामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे दिवाळीमध्ये फटाके न फोडण्याचे निर्देश योग्य असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post