'या' देशाने केली लस वितरणाची तयारी; मॉडर्नाच्या आणखी २० लाख डोसची मागणी


माय अहमदनगर वेब टीम

लंडन: जगभरात करोनाचे थैमान सुरू असून युरोपीयन देशांमध्ये दुसरी लाट आली आहे. तर, दुसरीकडे करोनाला अटकाव करण्यासाठी लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही लशींच्या अंतिम टप्प्यातील चाचणीचे प्राथमिक निष्कर्ष सकारात्मक आले आहेत. अशातच आता ब्रिटन सरकारने लस वितरणाची तयारी सुरू केली आहे. त्याशिवाय मॉडर्नाच्या आणखी २० लाख लशीचे डोसही खरेदी करण्यात येणार आहेत.

ब्रिटन सरकारने २० लाख डोस खरेदीचा करार केला असल्याची माहिती दिली. आतापर्यंत ब्रिटनने मॉडर्नाच्या एकूण ७० लाख डोस खरेदी करण्याचा करार केला आहे. मॉडर्ना लशीला अद्यापही ब्रिटनच्या औषध आणि आरोग्य उत्पादक नियामक संस्थेकडून मंजुरी मिळाली नाही. येत्या काही दिवसांमध्ये ही मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे.

ब्रिटन सरकार डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लस वितरीत करण्याच्या तयारीत आहे. ब्रिटन सरकारने आतापर्यंत सात कंपन्यांच्या एकूण ३५.७ कोटी लस डोसची मागणी नोंदवली आहे. ब्रिटन सरकारने लस निर्मिती, उत्पादन आणि वितरणासाठी आरोग्य मंत्री नादिम जहावी यांची नियुक्ती केली आहे. जहावी हे आरोग्य विभाग आणि व्यापार विभागादरम्यान एक संयुक्त मंत्री म्हणून लस वितरणाची जबाबदारी पार पाडणार आहेत.

ब्रिटन सरकारने ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाने विकसित केलेल्या लशीचा वापर करता येऊ शकतो का, याचा विचार करण्याची सूचना नियामक संस्थेला दिली. ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाने घेतलेल्या तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणीत काही चुका झाल्याचे समोर आले. त्यामुळे या लशीच्या परिणामकतेवर प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. लशीवर प्रश्न उपस्थित होऊ लागल्यावर कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. करोना लशीची आणखी अतिरिक्त चाचणी करण्यात येणार असल्याचे एस्ट्राजेनकाचे सीईओ पास्कल सोरिओट यांनी जाहीर केले आहे. लस किती प्रभावी आहे, याची चाचणी करण्यासाठी स्वयंसेवकांना आणखी एक लोअर डोस दिला जाऊ शकतो.

'ब्लुमबर्ग'ने दिलेल्या वृत्तानुसार, ऑक्सफर्ड लशीच्या लोअर डोसने पूर्ण डोसच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. पास्कल यांनी सांगितले की, आम्ही अधिक चांगली लस विकसित केली असल्याचा दाट विश्वास आहे. लस अधिक प्रभावी आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्हाला आणखी एक चाचणी घ्यावी लागणार आहे. ही चाचणी, संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवरील असणार असून जलदपणे हे काम करण्यात येईल.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post