देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचे घर पाडले?, फरांदे यांचा पलटवार

 




माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नाहीत ,'असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्य सरकारातील काही नेत्यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही काल, शनिवारी नगरमध्ये बोलताना फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. मात्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना भाजप नेत्या, आमदार देवयानी फरांदे यांनी प्रत्युत्तर दिले.

'देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचे घर पाडले आहे, असे एक तरी उदाहरण दाखवून द्या, असे आव्हानच फरांदे यांनी दिले आहे. त्या नगरमध्ये बोलत होत्या.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी 'तुम्ही मुख्यमंत्री असताना अनेक जणांना कशा पद्धतीने धमक्या दिल्या, त्याच्या तत्कालीन काळात अनेकांनी ऑडिओ क्लिप व व्हिडीओ क्लिप पाहिल्या आहेत. ते पुन्हा पुन्हा काढण्यास लावू नका,'असा इशारा देवेंद्र फडणवीस यांना देतानाच त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा खरपूस समाचार फरांदे यांनी घेतला. फरांदे म्हणाल्या, 'देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी सूडबुद्धीने कोणाचेही घर पाडण्याचे काम केले नाही. कुठलाही हातामध्ये कागद नसताना पुरावे नसताना कोणालाही धमकावण्याचे काम फडणवीस यांनी केले नाही. राज्य सरकारचे बोलाल तर अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे कंगना राणावत हे आहे. तुम्ही एखाद्या महिलेच्या एवढे मागे लागता की तिचे ऑफिस ती तेथे नसताना पाडता. तुम्ही तिला कुठलीही संधी देत नाही, न्यायालयात जाण्याची संधी देत नाही, आणि तिचे ऑफिस पाडून टाकता. मात्र विरोधकांनी एक तरी असे उदाहरण द्यावे की, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचे घर पाडले आहे. कंगना प्रकरणात न्यायालयाने सरकारला चपराक दिली आहे. आता न्यायालयाने सांगितले आहे की, हे दमदाटी करतात, हे घाबरवतात, सूडबुद्धीने कारवाई करतात .आम्ही जेव्हा म्हणत होतो तेव्हा आमच्यावर विश्वास नव्हता. मात्र आता कोर्टानेच यावर शिक्कामोर्तब केले आहे,' असेही फरांदे म्हणाल्या.

'महाराष्ट्रातील महिला या महाविकास आघाडी सरकारच्या काळात असुरक्षित झाल्या आहेत,' असा गंभीर आरोपही फरांदे यांनी केला. 'महिलांना रस्त्यावरती जाळणे, महिलांवरील होणारे बलात्कार असतील, अन्याय-अत्याचार असतील, अशा अनेक घटना एकावर महाराष्ट्रात घडत आहेत. मागच्या मार्च महिन्यातील अधिवेशनात सरकारने घोषित केले होते की आंध्रच्या धर्तीवर दिशा कायदा राज्यात आणू. परंतु आज नऊ महिने होऊन गेले, अधिवेशन संपले पण या महाराष्ट्रात दिशा कायदा सरकारने लागू केला नाही. या सरकारच्या कालावधीमध्ये गुन्हेगार मोकाट आणि सामान्य माणसांवर अन्याय-अत्याचार करण्याचे काम सुरू आहे. कुठेही महिला सुरक्षित नाही. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावले उचलताना हे सरकार कमी पडले आहे,' असा आरोपही त्यांनी केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post