'इधर से क्यू नहीं जाने दे रहे हो' म्हणत पोलिसाची कॉलर पकडली!

 


माय अहमदनगर वेब टीम

नगर: 'मेरे को इधर से क्यू नहीं जाने दे रहे हो,' असे म्हणत ट्रकच्या क्लीनरने पोलीस कर्मचाऱ्याच्या गणवेशाची कॉलर धरत तसेच त्याचा हात पकडत दमदाटी केली. नगर-पुणे महामार्गावरील केडगाव बायपास चौकामध्ये शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. 

पोलीस कर्मचारी अनिल राजाराम हराळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात ट्रकचा चालक कमलेश दुबाल सिंग (वय ४५) व क्लीनर अंकित कमलेश सिंग (वय १८, रा. भिलाई, छत्तीसगड) या दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस कर्मचारी अनिल हराळ हे केडगाव बायपास चौकात वाहतूक वळवण्याचे काम करीत होते. यावेळी पुण्याकडून नगरच्या दिशेला येणारा एक मालवाहतूक ट्रक (क्र. सीजे ७, एझेड ७५०३) त्यांनी अडवला. त्यानंतर या ट्रकमधील चालक कमलेश सिंग व अंकित सिंग यांनी हराळ यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच अंकित सिंग याने ट्रकच्या खाली उतरत, 'मेरे को इधर से क्यू नहीं जाने दे रहे हो,' असे म्हणत हराळ यांच्या गणवेशाची कॉलर व हात पकडला. तसेच त्यांना दमदाटी केली. याबाबत हराळ यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे पुढील तपास करीत आहे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post