माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी तब्बल तीन आठवडे देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवला आहे. एकीकडे कांदा, बटाटा, भाजीपाला यामुळे महागाईचा पारा चढला असता त्यात इंधनवाढीने आणखी भडका उडू नये, म्हणून कंपन्यांनी तीन आठवडे 'इंधन दर जैसे थे'च ठेवले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तूर्त वाहनधारकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरत आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी सलग २१ व्या दिवशी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. आज मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे.
साथीच्या आजाराचा व्यापक परिणाम होत असल्याने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ३.४५ टक्क्यांनी घसरले आणि ४० डॉलर प्रती बॅरलवर स्थिरावले. युरोप आणि उत्तर अमेरिकेत कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ झाल्याने तेथे पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे तेलाच्या दरांवर दबाव आल्याने तेलाचे अर्थकारण विस्कळीत झाले आहे.
लिबियातील सर्वात मोठ्या तेल क्षेत्राने पुन्हा उत्पादन सुरु केल्याने त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले. मात्र मागणीत उदासीनता कायम असल्याने तेलाच्या दरांवर आणखी नकारात्मक परिणाम झाला. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशननुसार अमेरिकी तेलसाठा मागील आठवड्यात १ दशलक्ष बॅरलपर्यंत होता. कारण डेल्टा चक्रीवादळाने किनारीभागातील कामकाज ठप्प होते. तेलाच्या मागणीत वाढ झाल्याने सौदी अरेबियातील क्रूड निर्यातीला गती मिळाली. ऑगस्ट २०२० मध्ये ही निर्यात दररोज ५.९७ दशलक्ष एवढी होती.
अनलॉकचा पाचवा टप्पा देशात सुरु असून रस्त्यावरील वाहनांची रहदारी वाढली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्या देखील काही प्रमाणात सुखावल्या आहेत. इंधन मागणी वाढल्याने अर्थव्यवस्था सावरत असल्याचे बोलले जात आहे.
Post a Comment