मुख्यमंत्र्यांकडून अहमदनगरमधील कोरोनादुताचे कौतुक*आरोग्य सर्वेक्षण करताना संवेदनशीलतेचा दिला जाधव यांनी प्रत्यय*

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहिम सुरु केली आहे. ही मोहिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राबविली जात आहे. कोरोनादूत प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन त्यातील सदस्यांची तपासणी करत आहेत. त्यांच्या याच कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. आज त्यांनी नागरिकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील बोटा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील पथकात कार्यरत आरोग्य कर्मचारी सुदाम जाधव यांच्या संवेदनशीलतेचे त्यांनी कौतुक केले. ज्येष्ठ महिलेला वेळेवर दवाखान्यात दाखल करून त्यांच्यावर योग्य वेळी उपचार सुरू करण्यासाठी श्री. जाधव यांनी पुढाकार घेतला होता.

जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविली जात आहे. त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी यांचे पथक प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची आरोग्य विषयक माहिती गोळा करत आहेत. त्यांची ऑक्सिजन लेवल आणि शरीराचे तापमान मोजले जात आहे. विशेषतः को- मोरबिड अर्थात इतर आजार असणारे आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यांची माहिती घेऊन त्यांना योग्य उपचार मिळावे यासाठी आरोग्य यंत्रणा राबत आहे. आरोग्य यंत्रणेच्या याच कामाची दखल आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतली. त्यात त्यांनी आवर्जून श्री. जाधव यांच्या कामाचा उल्लेख केला. यामुळे, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा हो मोहीम अधिक संवेदशीलतेने राबवत असल्याचेही स्पष्ट झाले.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी,  जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा जिल्हा सर्वेक्षण अधिकारी  डॉ. दादासाहेब साळुंके आदींच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ही मोहिम राबविली जात आहे. तालुकास्तरावर तालुका आरोग्य अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आशा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांच्यासह यंत्रणा राबत आहे.  ही यंत्रणा गावोगावी जाऊन नागरिकांशी संवाद साधत माहिती गोळा करत असून उपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे.

सुदाम जाधव हे आरोग्य कर्मचारी बोटा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कार्यरत आहेत. त्यांच्या पथकाला या केंद्राचे प्रमुख डॉ. कापसे यांनी अकलापुर येथील सर्वेक्षणाचे काम दिले होते. यावेळी त्यांना या गावातील एक ६८ वर्षीय महिलेला ताप सर्दी व श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे जाणवले. श्री.जाधव यांनी तपासणी केली असता या महिलेची ऑक्सिजन लेवल  ७८ टक्के आढळून आली. तात्काळ त्यांनी डॉ. कापसे यांना संपर्क केला. त्यानंतर या महिलेला उपचार करून त्यांची चाचणी करण्यात आली. पुढील उपचारासाठी त्यांना कोविड हेल्थ सेंटर संगमनेर येथे संदर्भित करण्यात आले. त्यांचा अहवाल पॉजीटिव आला. तात्काळ उपचार सुरू झाल्याने आज त्या आजारातून बऱ्या झाल्या आहेत. श्री. सुदामा जाधव यांनी योग्य वेळी निर्णय घेतल्याने या ज्येष्ठ महिलेला तात्काळ उपचार मिळू शकले.

श्री. जाधव यांच्या या संवेदनशीलतेबद्दल जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनीही कौतुक केले. या मोहिमेत काम करणारे सर्व कोरोनादुत अभिनंदनास पात्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post