युवराज सिंग निवृत्तीतून बाहेर येणार? बीसीसीआयला लिहिले पत्र

माय अहमदनगर वेब टीम

अमृतसर - एका वर्षापूर्वी म्हणजे जून 2019 ला भारताचा स्टार ऑल राऊंडर युवराज सिंगने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतर त्याने कॅनडातील ग्लोबल टी-20 स्पर्धेत सहभाग घेतला होता. पण, आता युवराज सिंगने आपल्या निवृत्तीच्या भुमिकेपासून यू टर्न मारला आहे. त्याने आपण पुनरागमनाचे प्लॅनिंग करत असल्याची घोषणा केली. 38 वर्षाच्या या धडाकेबाज क्रिकेटर जर सर्व गोष्टी प्लॅन प्रमाणे झाल्या, तर लवकरच पंजाब संघात परतणार आहे. तो पंजाबकडून एकदिवसीय आणि टी - 20 सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. जर युवराजने नजिकच्या काळात क्रिकेट खेळले नसले तरी तो पंजाबच्या युवा खेळाडूंबरोबर चांगला वेळ घालवत आहे. 


युवराज सिंग मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर शुभमन गील, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग आणि अनमोलप्रीत सिंग यांच्याबरोबर वेळ घालवत आहे. यावेळी त्याने या युवा खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शनही केले. याचवेळी युवराजला आपण पुन्हा क्रिकेटमध्ये परतावे असे वाटले असण्याची शक्यता आहे. 


मी युवा खेळाडुंबरोबर चांगला वेळ घालवला


माध्यमांशी बोलताना युवराज सिंगने सांगितले की युवा खेळाडुंबरोबरचा वेळ त्याने एन्जॉय केला. यावेळी त्याने युवा खेळाडूंची खेळासंदर्भात वेगवेगळ्या अनुशंगाने चर्चा केल्याचे सांगितले. यावेळी युवराजने नेटमध्ये बॅटिंगही केली. त्यावेळी त्याला अजूनही तो चांगल्या प्रकारे चेंडू टोलावू शकतो हे पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याचे त्याने सांगितले. 


तो म्हणाला 'मी युवा खेळाडूंबरोबरचा वेळ एन्जॉय केला. खेळा संदर्भातील विविध गोष्टींवर चर्चा केली. मी नेटमध्येही त्यांना काही गोष्टी शिकवण्यासाठी खेळलोही त्यावेळी मोठ्या गॅपनंतरही आजही चेंडू उत्तम प्रकारे टोलावू शकतो हे पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला.' युवराज पुढे म्हणाला की 'मी ऑफ सिजनच्या दोन महिन्यात फिटनेसवरही काम केले, तसेच फलंदाजीचा सरावही केला. मी काही सराव सामन्यात धावाही केल्या आहेत. त्यानंतर पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सचिव पुनीत बाली यांनी माझ्याशी संपर्क करुन मला माझ्या निवृत्तीबाबत पुर्नविचार करण्यास सांगितले.'


'सुरुवातीला मी हा प्रस्ताव स्विकारण्याबाबत साशंक होतो. मी देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मी तसेही बीसीसीआयची परवानगी मिळाल्यानंतर जगभरातील फ्रेंचायजी बेस स्थानिक लीग खेळणार होतोच. त्यामुळे मी बालींच्या विनंतीकडे दुर्लक्ष करु शकलो नाही. गेल्या तीन चार आठवड्यापासून माझ्या मनात अनेक विचार येत होते. ' असे सांगून त्याने आपल्या पुनरागमनाचे संकेत दिले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post