राज्यात कोरोना बळींचा उच्चांक; दिवसभरात ५१५ मृत्यू

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - राज्यात मंगळवारी 24 तासांत तब्बल 515 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी मृत्यूंची संख्या ही आजवरची सर्वाधिक आहे. दुसरीकडे, कोरोनाचा राज्यात कहर कायम असून, नवे 20 हजार 482 रुग्ण आढळले. 

यातील सर्वाधिक 88 मृत्यू नागपुरात झाले आहेत. मुंबईत 49, ठाणे जिल्ह्यात 82, पुणे जिल्ह्यात 50, कोल्हापुरात 49, तर सांगलीत 38 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. महाराष्ट्रात आजवर कोरोनाने 30 हजारांहून अधिक जणांचा जीव घेतला आहे.

मुंबईतही मंगळवारी कोरोनाच्या 1585 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाख 73 हजार 534 वर पोहोचला आहे. दिवसभरात 49 जणांचा मृत्यू झाला. दीड लाखापर्यंत कोरोना रुग्णसंख्या पोहोचलेल्या ठाणे जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे 1600 रुग्ण आढळले, तर तब्बल 34  पॉझिटिव्ह रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत 3 हजार 983 रुग्णांचे बळी गेले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे जिल्ह्यातील एक लाख 49 हजार 440 रुग्णांपैकी कल्याण, ठाणे आणि नवी मुंबई या तीन शहरांमधील  रुग्णसंख्या 98 हजारांच्या पुढे गेली आहे.

महाराष्ट्रातील आजवरची रुग्णसंख्या आता 11 लाखांवर पोहोचली आहे. त्यातील 7 लाख 75 हजार 273 रुग्ण बरे झाले. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70. 62 टक्के एवढे आहे तर मृत्यूदर 2.77 टक्के इतका आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सध्या मुंबई आणि ठाणे पट्ट्यात 60 हजार कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुण्यात 80 हजारांहून अधिक तर नागपूरात 20 हजारांहून अधिक रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. रायगड, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद या प्रमुख शहरांत प्रत्येकी दहा हजारांच्या आसपास अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पश्चिम महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. सांगली, कोल्हापुरात रुग्णसंख्या प्रत्येकी दहा हजारांच्या आतबाहेर असली तेथे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे वाढलेले प्रमाण चिंताजनक स्थिती दर्शविते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post