दुर्दैवी घटना ; दुचाकीसह बाप-लेक गेले वाहून

 


माय अहमदनगर वेब टीम

भोकरदन (जालना) - भोकरदन तालुक्यातील आठही मंडळात शनिवारी सायंकाळच्या सुमारास मुसळधार तर काही ठिकाणी ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने सर्वच ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. सोयगाव देवी भागांत देखील नाल्याला मोठा पूर आला होता. याच दरम्यान येथील आरोग्य विभागातील कर्मचारी शालीकराव सहाणे यांचा २८ वर्षांचा मुलगा आणि त्यांची ७ वर्षांची चिमुकली दुचाकीसह गावातील पुलावरून वाहून घेल्याने दोघां बापलेकीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे

या दुर्दैवी घटने विषयी अधिक माहिती अशी की, भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथील तरुण विलास शालिकराव सहाने (वय २८) हा सायंकाळी ७ वाजता किराणा सामान घेण्यासाठी त्याची लहान मुलगी कल्यानी (वय ७) सोबत गावात दुचाकीवरून आला होता, त्या अगोदर सोयगाव देवी परिसरात मुसळधार पावसाला सुरवात झाली होती. त्‍यामुळे ओढ्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. 

दरम्यान रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहुन विलास हा सामान घेऊन आपल्या लेकीसोबत दुचाकीवरून आपल्या शेतातील घराकडे निघाला होता. याच रस्त्यावर असलेल्या पोतका नाल्याच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत होता. रात्रीची वेळ असल्याने विलासला पाण्याचा अंदाज आला नाही, त्याने आपली दुचाकी या पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दुचाकीसह विलास आणि त्याची मुलगी कल्यानी या पुलावरून पाण्यात वाहून गेले.

विलास व आपली नात उशीर झाला तरी घरी आले नाही म्हणून वडिलांनी गावात फोन लावुन विचारणा केली. पुलावरून मोठया प्रमाणात पाणी वाहत होते याचा अंदाज गावकऱ्यांना होताच, गावकऱ्यांना संशय आल्‍याने पुलाकडे धाव घेवुन पाहणी केली, तर या पुलावरुनच ते दोघे वाहून घेल्याचा अंदाज त्यांना आला. गावकऱ्यांनी रात्री साडेनऊ वाजल्‍यापासून शोधमोहीम सुरु केली, तेव्हा गाडी ही पुलाच्या जवळच पडलेली आढळून आली, व चिमकुली कल्याणीचा मृतदेह पुलाच्या काही अंतरावर रात्री २ च्या दरम्यान दिसून आला. दरम्यान विलास सापडत नसल्याने गावकऱ्यांनी रात्रभर शोध मोहीम सुरू ठेवली. दरम्‍यान रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारस सोयगाव देवी येथुन ३ किमी अंतरावर असलेल्या वालसा येथील बंधाऱ्यात अडकलेल्या अवस्थेत विलासचा मृतदेह सापडला. आज (रविवारी) दुपारी दोघांच्याही मृतदेहाची ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासनी करण्यात आली.  

विलासला हट्टीपणा भोवला 

विलासला गावातील काही तरुणांनी सांगितले होते, पुलावरून पाणी जात आहे. तू जाऊ नको. पण त्याने मित्रांचे ऐकले नाही. शेवटी जे व्हायचे तेच झाले. मृत विलासला दोन मुली व एक मुलगा आहे, यापैकी कल्याणी ही दोन नंबरची मुलगी होती. अत्यंत कमी वयात विलास यांचा मृत्‍यू झाल्‍याने एक मुलगा आणि एका मुलीची सर्व जबाबदारी पत्नीवर आली आहे. 


दोघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार; सोयगाव देवी गावावर शोकाकळा

विलास सहाने व कल्यानी या बापलेकीच्या मृत्यूने पूर्ण गावावर शोकाकळा पसरली आहे. रविवारी दुपारी अगोदर कल्याणीला निरोप देण्यात आला. त्यानंतर विलासवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वांचे डोळे भरून आले होते. सकाळपासून गावात चूल पेटली नव्हती. तर सकाळी सर्व दुकाने बंद होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post