#SorrySara, #SorryRakul ट्रेंडवर कशासाठी?

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - एका इंग्रजी वृत्तवाहिनीने सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने ड्रग्ज प्रकरणात सारा अली खान आणि रकूल प्रीत या दोन अभिनेत्रींची नावे घेतल्याचा दावा केला. या प्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण यंत्रणा (NCB ) सारा अली खान आणि रकूल प्रीत सिंग यांना नोटिस बजावणार असल्याचेही वृत्त आले होते. पण, याबाबत खुद्द एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी अशी कोणतीही चौकशीची नोटिस बजावण्यात येणार नसल्याचे सांगत हे वृत्त खोडून काढले. त्यानंतर सोशल मीडियावर “#SorryRakul, #SorrySara असे ट्रेंड सुरु झाले. 

एका इंग्रजी वृत्तवाहिनीने रिया चक्रवर्तीने ड्रग्ज प्रकरणी चौकशीदरम्यान बॉलिवूडमधील अनेक अनेक सुप्रसिद्ध चेहरे ड्रग्जचे सेवन करतात असे सांगितल्याचा दावा केला होता. त्यात सारा अली खान आणि रकूल प्रीत सिंग या अभिनेत्रींसह फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांच्या नावांचाही समावेश आहे असाही दावा केला होता. या वृत्तात एनसीबीने 25 बॉलिवूड सेलिब्रेटींच्या नावांची यादी तयार केली आहे. त्यांना या प्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचेही सांगितले होते. 

परंतु, एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कोणतीही बॉलिवूडची यादी चौकशीसाठी तयार करण्यात आलेली नाही. ते म्हणाले की 'आम्ही कोणतीही कोणतीही बॉलिवूडची यादी तयार केलेली नाही. पूर्वी यादी तयार केली होती ती ड्रग्ज पेडलर आणि तस्करांची होती. ही यादी बॉलिवूडची यादी असा गोंधळ झाला. कोणतेही नाव चौकशीसाठी रडावर नाही.'

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर रिया, तिचा भाऊ शोविक, सॅम्युल मिरांडा, दिपेश सावंत, अब्दुल बसित आणि झैद विरात्रा यांना अटक करण्यात आली आहे. सुशांतच्या घरच्यांनी रियाविरोधात सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आणि त्याच्या पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप करून तक्रार दाखल केली आहे. रिया ड्रग्ज प्रकरणी सध्या भायखला जेलमध्ये आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post