मान्सून परतीचा प्रवास पंधरा दिवसांनी लांबणार माय अहमदनगर वेब टीम

पुणे -राज्यातून यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास तब्बल पंधरा दिवसांनी लांबणार आहे. यंदा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्याऐवजी ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत राज्यात मुक्काम ठोकून नंतरच तो परतीच्या प्रवासाला निघेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. हा पाऊस पुढील आठ दिवस कायम राहणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राजस्थानच्या दक्षिण भागापासून मान्सून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. सरासरी तारखांनुसार मान्सून दरवर्षी 1 सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू करतो. मात्र, यावर्षी हवामानशास्त्र विभागाने मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची तारीख 17 सप्टेंबर सांगितली आहे.

कमी दाबाने मुक्काम वाढला

सध्याची स्थिती पाहता मान्सूनचा प्रवास लांबण्याचीच शक्यता अधिक आहे. गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कार्यरत असून, त्याचा प्रभाव कायम आहे. याबरोबरच पुढील चार ते पाच दिवसांनंतर याच भागात आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. यासह दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीपासून कर्नाटकपर्यंत द्रोणीय स्थिती, अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीचा प्रभाव वाढला आहे. यामुळे राजस्थानच्या पश्चिम भागातून मान्सूनचा सुरू होणारा परतीचा प्रवास सुमारे आठवडाभराने लांबणार आहे.

चार दिवस काही ठिकाणी मुसळधार


पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सक्रिय असून, पुढील तीन ते चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनुक्रमे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सोलापूर, नाशिक, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


बंगालच्या उपसागरातील पश्चिम मध्यभाग आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. याबरोबरच बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम भागात असलेली चक्रीय स्थिती पुढील दोन ते तीन दिवसात पश्चिम उत्तर भाग आणि त्यानंतर तेलंगणाकडे सरकणार आहे. तसेच दक्षिण गुजरात किनारपट्टीपासून ते उत्तर कर्नाटकपर्यंत द्रोणीय स्थिती असून, पुढील पाच दिवसांनंतर ही स्थिती पश्चिम किनारपट्टीकडे सरकणार आहे. याचा प्रभाव राज्यात जाणवणार आहे. त्यामुळे 19 सप्टेंबरपर्यंत काही भागात मुसळधार पाऊस पडेल. विशेषत: मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर चांगला दिसून येणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post