लॉकडाऊनमुळे मुंबई दर्शन सेवेला ५० कोटींचा फटका



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - लॉकडाऊनमुळे मुंबईतील पर्यटनस्थळ बंद असल्याने त्याचा मोठा फटका मुंबई दर्शन सेवेलाही बसला आहे. मुंबई दर्शन सेवा पुरवणार्‍या 100हून अधिक बसेस लॉकडाऊनपासून ठप्प पडलेल्या आहेत. परिणामी, या बसचालकांचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान गेल्या पाच महिन्यांत झाले आहे.

पटेल टुअर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील बहुतेक पर्यटनस्थळे बंद असल्याने अद्यापही मुंबई दर्शन सेवा बंद ठेवण्यात आली आहे. शासन स्तरावरील हालचाली  पाहता ऑक्टोबर महिन्यात ही सेवा पूर्ववत सुरू करण्याची शक्यता आहे. याआधी प्रत्येक प्रवाशाकडून मुंबई दर्शन सेवेसाठी 600 रुपये आकारले जात होते. या रुपयांत ठराविक पर्यटनस्थळांवर लागणार्‍या तिकिटाच्या रकमेचाही समावेश होता. सध्या काही बसेस प्रवासी वाहतुकीचे काम करत आहेत. मात्र त्यात फक्त बस चालकाचे वेतन निघत आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.

या पर्यटनस्थळांना बसला फटका

पर्यटनस्थळांची सफर करताना बस चालक गेट वे ऑफ इंडियासह ताज महाल हॉटेल (जुने व नवे), कोस्टल बोटिंग, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, ओरामा 5डी थिएटर, जहांगीर आर्ट गॅलरी, मंत्रालय, विधिमंडळ, नरिमन पॉईंट, ओबेरॉय हॉटेल, एअर इंडिया बिल्डिंग, वानखेडे स्टेडियम, मरिन ड्राईव्ह (क्वीन नेकलेस), तारपोरवाला मत्स्यालय, गिरगाव चौपाटी, कमला नेहरू पार्क, बूट हाऊस(म्हातारीचा बूट), हँगिंग गार्डन, टॉवर ऑफ सायलेन्स, अँटालिया (अंबानी यांचे घर), महालक्ष्मी मंदिर, हाजीअली, महालक्ष्मी रेस कोर्स, सायन्स ओडिसी थिएटर, नेहरू सायन्स सेंटर, सिद्धिविनायक मंदिर, वांद्रे-वरळी सी लिंक, लीलावती रुग्णालय, बँडस्टँड (वांद्रे), सिने कलाकारांचे बंगले (अमिताभ बच्चन, शाहरूख खान, सलमान खान), जुहू चौपाटी याठिकाणी पर्यटकांना फिरवून आणतात. यामधील बहुतेक पर्यटनस्थळे ही दुरूनच दाखवली जातात. याउलट काही पर्यटनस्थळांवर पर्यटकांना मजा लुटण्याचा आनंद घेता येतो. मात्र लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष अनुभवता येणार्‍या जुहू चौपाटी, मरिन ड्राईव्ह, नरिमन पॉईंट, महालक्ष्मी, हाजीअली या पर्यटनस्थळांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

असे बिघडले आर्थिक गणित

*    मुंबई दर्शनसाठी गेट वे ऑफ इंडियापासून वाशी, कल्याण आणि मुंबईच्या वेशीवरून 100हून अधिक बसेस सुटतात.
*   मुंबई दर्शनसाठी एका प्रवाशाकडून बस मालक सरासरी 500 ते 600 रुपये आकारतात.
*    या तिकीट दरात तारापोरवाला मत्स्यालय, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, बोटिंग सेवा याठिकाणी लागणार्‍या तिकिटांचा समावेश असतो.
*   अशाप्रकारे एक बस मालक दिवसभरात मुंबई दर्शन फेरीतून 25 हजार रुपयांचा व्यवसाय करतो.
*   100हून अधिक बसेसच्या माध्यमातून एकट्या खासगी मुंबई दर्शन सेवेचा हा व्यवसाय दिवसाला 25 लाख रुपयांची उलाढाल करतो.
*   गेल्या सहा महिन्यांत या व्यवसायातून झालेल्या नुकसानाचा आकडा 50 कोटींच्या घरात पोहोचला आहे.
*    याशिवाय मुंबई दर्शन सेवेवर अवलंबून असलेल्या विविध पर्यटनस्थळांवरील घटकांचे नुकसान मोजण्यापलीकडे असल्याचे बस मालक संघटनेने सांगितले.




0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post