तर शेतकऱ्यांच्या दुःखावर केंद्र सरकारच्या डागण्या- मंत्री थोरात

 

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - 'करोना संसर्गामुळे शेतकरी भरडला गेला आहेच. त्याच्या शेतीमालाचे आधीच नुकसान झाले आहे. त्यानंतर पुन्हा कांद्याची निर्यातबंदी हे शेतकऱ्यांच्या दुःखावर केंद्र सरकारने दिलेल्या डागण्या आहेत,' असा घणाघात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. 'चार पैसे शेतकऱ्याला मिळण्याच्या वेळेसच केंद्र सरकारने असा निर्णय घेणे अत्यंत चुकीचे व निषेधार्ह आहे,' असेही ते म्हणाले

बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी अभियान' याला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला आमदार लहू कानडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, दीप चव्हाण, मयूर पाटोळे आदी उपस्थित होते. 

या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना थोरात यांनी कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावरून केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, 'कांदा निर्यातबंदी हे शेतकऱ्यांच्या दुःखावर केंद्र सरकारने दिलेल्या डागण्या आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे. चार पैसे शेतकऱ्याला मिळण्याच्या वेळेतच असा निर्णय घेणे अत्यंत चुकीचे व निषेधार्ह आहे. केंद्र सरकारने दुधाची भुकटी आयातीचा सुद्धा निर्णय घेतला. ज्यावेळी महाराष्ट्रात आणि देशात प्रचंड दूध आहे, दुधाची भुकटी आहे, अशा वेळी भुकटी आयात केल्यामुळे दुधाचा दर कोसळले. कारण भुकटी तयार करण्याचे जे उत्पादन होते, ते थांबले. त्यामुळे हे सगळे निर्णय शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्याच्या विरोधी असून त्याचा आम्ही निषेध करतो,' असेही त्यांनी स्पष्ट केले

दरम्यान, धार्मिक स्थळे उघडण्याबाबत भाजपने आंदोलन केले होते. त्यावर थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, 'एक तर करोनाचे संकट वाढत आहे. ते रोखले पाहिजे हे सर्वांना समजते. त्यामुळे इथे राजकारण करण्याची जागा नाही. जेथे लोक एकत्र येतात, तेथे संसर्ग वाढतो, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्या बाबतीत जो निर्णय घ्यायचा तो काळजीपूर्वक घ्यावा लागेल.'

काँग्रेसला मराठा आरक्षण या मुद्द्यावर रस नाही, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. याबाबत थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, 'या बोलण्याला अजिबात अर्थ नाही. काँग्रेसचे सरकार असेल किंवा आघाडी सरकार हे या मुद्द्यावर काळजी घेत आहे. या मुद्द्यावर राजकारण करू नये, अशी आमची इच्छा आहे. कारण हा सगळ्यांचाच विषय आहे. त्यामुळे सगळ्यांनीच मदत केली पाहिजे. राज्यात ज्यावेळी त्यांचे सरकार होते तेव्हा या मुद्द्यावर आम्ही कोणतेही राजकारण केले नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post