व्याजदर आणखी कमी होण्याची शक्यता; रिझर्व्ह बँकेचे संकेत

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - सध्या जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. देशातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर येत्या काळात व्याज दरात आणखी कपात केली जाऊ शकते, असे संकेत रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आले. अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकट करून मार्गावर आणण्यासाठी सावधानता बाळगून पुढे जावं लागणार असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं.

कोरोना महामारीनंतर आता अर्थव्यवस्थेला पुन्हा एका मार्गावर आणण्यासाठी सावधानता बाळगून पुढे जावं लागणार आहे. तसंच आर्थिक क्षेत्रालाही आता सामान्य स्थितीत यावं लागणार असल्याचं शक्तीकांत दास म्हणाले. ‘रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपययोजना लवकरच हटवल्या जातील असं कोणीही समजू नये,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं. बँकिंग क्षेत्र सध्या उत्तम स्थितीत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं विलिनिकरण एक योग्य दिशेत उचलण्यात आलेलं पाऊल आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकट करत मार्गावर आणण्यासाठी दक्षताही बाळगणं तितकच महत्त्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलं.

‘बँकांना सद्यस्थितीत आव्हानांचा सामना करावा लागेल हे स्पष्ट आहे. परंतु बँका या आव्हांनांना कसा प्रतिसाद आणि तोंड देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. देशातील कोरोना महामारीचा प्रकोप आणि त्याच्या अन्य बाबींवर स्पष्टता आल्यानंतर रिझर्व्ह बँक महागाई आणि आर्थिक वद्धीबाबत आपला अंदाज वर्तवणार आहे,’ असंही दास यांनी स्पष्ट केलं. ‘कर्ज देण्यात गरजेपेक्षा अधिक सतर्कता बाळगण्यानं बँकांनाच अधिक नुकसान होणार आहे आणि मूलभूत कामं नं केल्यानं बँकाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. जोखीम पत्करण्यापासून बचाव करण्याऐवजी बँकांनी आपल्या रिक्स मॅनेजमेंट आणि गव्हर्नंन्स फ्रेमवर्कला अधिक सक्षम केलं पाहिजे,’ असंही दास म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post