जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी दिला राजीनामा

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली- जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. जपान जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. आबे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. 

राजीनामा दिलेल्या शिंजो आबे यांनी निवेदनात म्हटले आहे की, मी पंतप्रधान पदावरून पायऊतार होण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकृती साथ देत नसल्याने हा निर्णय घेतला आहे. कोरोना संकट समोर असताना तसेच विविध धोरणांची अंमलबजावणी करायची आहे. ती अजूनही पूर्णत्वास गेलेली नाहीत. असे असतानाही एक वर्षाचा कालावधी राहिला असताना मी पद सोडत आहे. त्याबद्दल जपानी जनतेची माफी मागत आहे, असे आबे म्हणाले. यावेळी ते भावनिक झाल्याचे दिसून आले. 

त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, नवीन उपचार सध्या करून घेत आहे. त्यासाठी नियमित लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे पदाला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे लोकांनी दिलेला जनादेश आत्मविश्वासाने पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे पदावर अधिक काळ न राहण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार उत्तराधिकाऱ्याची नेमणूक होईपर्यंत ते कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे. उत्तराधिकारी निवडण्यासाठी लिबरल डेमॉक्रॅटिक पार्टीच्या लॉमेकर्स आणि सदस्यांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. 

त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. असे असले तरी  देशाचे अर्थमंत्री तारो असो आणि मुख्य सचिव योशिहीदे सुगा यांच्यामध्ये चुरस आहे. शिंजो आबे यांनी दुसऱ्यांदा आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी त्यांनी २००७ मध्ये राजीनामा दिला होता. पहिल्या कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षात राजीनामा दिल्याने त्यांनी लोकांची माफी मागितली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post