अलमट्टीची उंची वाढविण्यास सर्वपक्षीय विरोध



माय अहमदनगर वेब टीम

कोल्हापूर - कोल्हापूर-सांगली जिल्ह्याच्या अस्तित्वावरच घाला घालणार्‍या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करीत असलेल्या कर्नाटक सरकारविरोधात महाराष्ट्रातून विरोधाचा एकमुखी आवाज उठला आहे. सर्व पक्षांनी कर्नाटकची ही कृती कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या मुळावरच येणार असल्याचे सांगून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध करीत उग्र आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.

महाराष्ट्रातील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेबरोबरच विरोधी पक्ष असलेल्या भाजपनेही कर्नाटकच्या या प्रस्तावाविरोधात थेट दंड थोपटले आहेत. यामध्ये सत्ताधारी व विरोधी आघाडीतील संघटनाही सहभागी झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटनेचा यामध्ये समावेश आहे.

कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवायला प्रामुख्याने कोल्हापूर व सांगलीतून तीव्र विरोध सुरू झाला आहे. या विषयावरून संघर्ष छेडण्याची तयारी राजकीय पक्ष व विविध सामाजिक संघटनांनी सुरू केली आहे.

खा. धैर्यशील माने यांनी कर्नाटकने तसे पाऊल उचलल्यास भविष्यात महाराष्ट्रातून कर्नाटकात पाणी सोडताना राज्याला विचार करावा लागेल, असे म्हटले आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील बहुतांश लोकप्रतिनिधींनी अलमट्टीची उंची वाढवायला विरोध केला आहे. कर्नाटकने तसा निर्णय घेतल्यास वेगवेगळ्या पातळीवर त्याविरुद्ध लढा देण्याचा इशाराही विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे.

अलमट्टीची आत्ताची उंचीही महाराष्ट्राला मान्य नाही 

अलमट्टी धरणाची उंची वाढू शकत नाही. या धरणाची आताची उंचीही महाराष्ट्राला मान्य नाही. त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी धरणाच्या उंचीवर आक्षेप न घेतल्यामुळे प्रश्‍न निर्माण झाला आहे. यापुढे धरणाची उंची वाढवण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही, अशी स्पष्ट भूमिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत शुक्रवारी व्यक्‍त केली. 

अलमट्टी उंची संदर्भात येडियुराप्पांशी बोलणार

अलमट्टी धरणाची सध्या आहे तीच उंची जास्त आहे; पण तत्कालीन राज्यकर्त्यांनी या उंचीला विरोध न केल्यामुळे धरणाने ही उंची गाठली आहे. यापेक्षा धरणाची उंची वाढवण्याला आमचा विरोध आहे.  पहिल्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समजावून सांगू. त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडे अलमट्टी धरण्याच्या उंची वाढविण्याला परवानगी देऊ नये, असा आग्रह धरू, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

उंची वाढवण्याचा विचारसुद्धा कर्नाटकने करू नये

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचे सूतोवाच केले आहे. महाराष्ट्राच्या मुळावर येणारा असा कोणताही प्रस्ताव हाणून पाडण्याचे सामर्थ्य शिवसेनेत आहे. कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा विचारसुद्धा मनात आणू नये; अन्यथा शिवसेना ही संपूर्ण योजना हाणून पाडण्यासाठी आकाश पाताळ एक करेल, असा इशारा खा. संजय मंडलिक यांनी दिला आहे.

कोल्हापूर, सांगलीचे नुकसान होणार असल्याने विरोध

अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे निर्माण होणार्‍या महापुराचे परिणाम आम्ही भोगले आहेत. या धरणाची उंची वाढल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील जमिनींचे प्रचंड नुकसान होणार आहे. या भागातील शेती या उंचीने उद्ध्वस्त होणार असून शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती आहे. त्यामुळे या धरणाची उंची वाढवायला आमचा विरोध असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले. 

कृष्णा-भीमा नदीजोड प्रकल्प शासनाने हाती घ्यावा

पाणीवाटप लवादाच्या निर्णयाप्रमाणे कर्नाटकचे पाणी आधी शिल्लक आहे का हे विचारात घ्यावे लागेल. महाराष्ट्राला न विचारता ते असा निर्णय घेऊ शकत नाहीत. अलमट्टीचा मुद्दा निकालात काढण्यासाठी  महाराष्ट्राने कृष्णा-भीमा नदीजोड प्रकल्प हाती घेऊन हे पाणी मराठवाड्याच्या दुष्काळी भागात वळवावे, असे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post