धक्कादायक!; ‘मटका किंग’ची गोळ्या झाडून हत्या


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मटका किंग नावाने ओळख असलेल्या जिग्नेश ठक्कर याची शुक्रवारी मध्यरात्री कल्याण स्थानकाजवळ नीलम गल्ली येथे गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे.


कल्याण स्थानकाजवळील नीलम गल्ली येथे असलेल्या आपल्या कार्यालयातून घरी जाताना हल्लेखोरांनी जिग्नेशवर गोळीबार केल्याची माहिती आहे. त्याच्या छातीत चार गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनंतर जिग्नेशला कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गॅंगस्टर धर्मेश नितीन शहा, जयपाल उर्फ जपान व अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील धर्मेश शहा याचा यापूर्वी डॉन छोटा राजन टोळीशीही संबंध होता, तसेच त्याच्याविरोधात काही गुन्हेही दाखल आहेत.

जिग्नेश ठक्कर याचे ठाणे, कल्याण, उल्हासनगर परिसरात अनेक ठिकाणी मटका आणि पत्त्यांचे क्लब आहेत. शिवाय तो क्रिकेट मॅचवरही सट्टा घेत असल्याची माहिती आहे. दरम्यान, जिग्नेशची हत्या का केली हे अद्याप नेमकं स्पष्ट झालेलं नाही. पण, या घटनेची माहिती मिळताच एमएफसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली असून काही पथकं हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post