नागरिकांनी कोरोना पासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाय अवलंबवावेत – आ. डॉ. सुधीर तांबे


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : किरण काळे यांच्या पुढाकारातून नगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने हाती घेण्यात आलेली ‘मिशन पॉझिटिव्ह सोच’ ही चळवळ कौतुकास्पद आहे. या माध्यमातून कोरोनाच्या बाबत समाजामध्ये सकारात्मकता निर्माण करण्याचे काम होत आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.*

शहर काँग्रेसच्या मिशन पॉझिटिव्ह सोच अभियानामध्ये ते आज (दि. २ ऑगस्ट) सकाळच्या सत्रात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नगर शहरातील नागरिकांना संबोधित करत प्रतिबंधात्मक उपाय अवलंबवण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना आ.तांबे म्हणाले की, कोरोनाच्या या संकट काळामध्ये नागरिकांनी धाडसी व्हायला पाहिजे. परंतु त्याचवेळी त्यांनी स्वतःची काळजी देखील घेतली पाहिजे. कोरोना संसर्गा मध्ये मृत्यूचे प्रमाण हे अत्यल्प असून केवळ दोन टक्के एवढेच आहे. त्यामुळे त्याला घाबरण्याचे काही कारण नाही. मुळात वेळेत उपचार केल्यास महागड्या अशा वैद्यकीय उपचारांना देखील सामोरे जायची आवश्यकता भासत नाही. आपण जर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधला आणि उपचार घेतले तर अत्यल्प उपचारांमध्ये लोक कोरोना मधून बरे होत आहेत हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे.

कोरोनाच्या लक्षणांमध्ये केवळ सर्दी आणि ताप यांचाच समावेश आहे असे नाही. तर अलीकडच्या काळामध्ये त्याची इतर लक्ष देखील समोर आली आहेत. जुलाब, अती थकवा येणे, तोंडाची चव जाणे ही देखील कोरोनाची लक्षणे असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कपणे अशी काही लक्षणे आढळली तर तात्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी आ.तांबे यांनी केले आहे.

पुढे बोलताना आ.तांबे म्हणाले की, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय अवलंबणे अधिक गरजेचे आहे. यामध्ये बचावासाठी मास्क वापरणे हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण कोरोनाचा विषाणू हा नाका, तोंडावाटे शरीरामध्ये प्रवेश करतो. आपण जर कोरोना प्रवेश करणारी ही दारेच उघडी ठेवली तर तो आपल्याला नक्कीच संक्रमित करणार आहे. मात्र आपण ही दारं बंद ठेवण्याची खबरदारी घेतली तर कोरोनाच्या संक्रमणापासून आपला निश्चित बचाव होऊ शकतो.

नागरिकांनी एकमेकांशी संवाद साधताना सोशल डिस्टंसिंगचे पालन केले पाहिजे. खरोखर अत्यावश्यक काम असेल तेव्हाच घराच्या बाहेर पडले पाहिजे. अन्यथा घरात राहण्यालाच नागरिकांनी पसंती द्यावी. जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत आपल्याला ही खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी आ.तांबे यांनी केले.

जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांचे या अभियानासाठी मार्गदर्शन मिळत आहे. तसेच नगर शहर युवक कॉंग्रेसची टीम शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाच्या यशस्वितेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.

*किरण काळे यांचे आ. तांबें कडून  कौतुक*
किरण काळे यांच्या संकल्पनेतून शहर काँग्रेसच्यावतीने हे अभियान राबविले जात आहे. किरण काळे यांनी घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे यांनी काढले. लोकांना कोरोना होऊच नये यासाठी हे अभियान असून ही एक सामाजिक चळवळ आहे. या अभियानाच्या माध्यमातून ज्यांना कोरोना झाला होता अशांच्या अनुभवांचे कथन देखील या अभियानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्याचा जनजागृतीसाठी नक्कीच फायदा होईल असे आमदार तांबे यावेळी म्हणाले.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post