पद्मनाभ स्वामी मंदिरातील ७ व्या तळघराचे रहस्य कायम
माय अहमदनगर वेब टीम
तिरुवनंतरपूरम - केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरातील खजिन्याचा आणि संपत्तीचा वाद आता संपुष्टात आलेला आहे. 2 लाख कोटी रुपयांच्या घरात ही संपत्ती आहे. केरळ उच्च न्यायालयाने हे सर्वकाही राज्य सरकारच्या मालकीचे असल्याचा निर्वाळा दिला होता. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्याविरुद्ध गेला आणि अंतिम निकालानुसार, आता संपत्तीचे व्यवस्थापन त्रावणकोरच्या राज परिवाराकडे आलेले आहे. सहा तळघरांतून सोने, हिरे, बहुमूल्य माणके असा अपार खजिना समोर आला... पण सातव्या तळघराचे दार अद्याप उघडण्यात आलेले नाही... या तळघरात किती खजिना दडलेला असेल, याबद्दल अवघ्या जगाला उत्सुकता आहे.
प्राप्त परिस्थितीत हे रहस्य कधीही उलगडणार नाही, याचीच शक्यता अधिक आहे. मंदिरातील सातव्या तळघराचे दार लाकडाचे आहे. दाराला कडी, नट-बोल्ट, साखळी, कुलूप काहीही नाही. तरीही दार बंद कसे, हे एक रहस्यच आहे आणि याबद्दल शास्त्रज्ञांना अप्रूप आहे.हे देवस्थान देशातील सर्वाधिक श्रीमंत असून, 2 लाख कोटी रुपयांच्या जवळपास त्याची मालमत्ता आहे. मंदिर रहस्यांनी भरलेले आहे, ते वेगळे. मंदिराच्या सातव्या दारामागे खजिन्याचे भंडार असल्याचे म्हटले जाते; पण अनेक कारणांनी हे दार अद्याप उघडलेले नाही.
इतिहास संशोधक डॉ. एल. ए. रवी वर्मा यांच्या मते, हे मंदिर 5 हजार वर्षांपूर्वीचे आहे. मंदिराची स्थापत्य शैली पाहता ते सोळाव्या शतकातील त्रावणकोर राजांच्या काळात उभारले गेल्याचेही म्हटले जाते. हे मंदिर त्रावणकोर राजांचे मंदिर म्हणूनच ओळखले जाते. सन 1750 मध्ये महाराज मार्तंड वर्मा यांनी स्वत:ला पद्मनाभ दास म्हणून रीतसर जाहीर केले होते. तेव्हापासून हे राजघराणे या मंदिराच्या सेवेत आहे. आताही राजघराण्याच्या अधीन असलेल्या एका खासगी ट्रस्टकडूनच मंदिराची देखरेख सुरू आहे.
उघडणारच नाही सातवे तळघर!
त्रावणकोर घराण्यातील राजांनी अडीनडीला उपयोगात यावी म्हणून या मंदिरात पिढ्यान्पिढ्या संपत्ती साठवलेली आहे. मंदिरात 7 गुप्त तळघरे आहेत. न्यायालयाच्या देखरेखीखाली सहा तळघरांची दारे उघडली गेली आहेत. एकूण 1 लाख 30 हजार कोटी रुपये किमतीचे (मोघम मूल्यांकन) हिरेजडीत सोन्याचे दागिने त्यात आढळले आहेत. सातव्या व शेवटच्या तळघराच्या दारावर नागाची भव्य आकृती कोरलेली आढळली आणि हे दार उघडण्याचा बेत रद्द करण्यात आला. दारावर स्वत: भगवान विष्णूचे परमभक्त शेषनाग राखण करत असल्याची श्रद्धा त्यामागे असल्याचे बोलले जाते. हे दार उघडणे म्हणजे मोठ्या संकटाला निमंत्रण देणेच असल्याने ते उघडले गेले नाही, असे म्हटले जाते. मंदिराचे हे तळघर उघडावे की नाही, याचा निर्णयही मंदिराच्या प्रशासकीय तसेच सल्लागार समितीवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे आता ते उघडले जाणारच नाही, असेही मानले जात आहे.
सातवे तळघर न उघडण्याची कारणे
टी. पी. सुंदरराजन यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळेच मंदिरातील खजिन्याची तळघरे उघडण्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता. सुंदरराजन यांचा आकस्मिक मृत्यू त्यामुळेच झाला, असे येथे मानले जाते. आता सातवा दरवाजा उघडल्यास मंदिरच नष्ट होईल आणि प्रलय येईल, अशी भीती आहे.
इतिहास संशोधक तसेच पर्यटक अॅमिली हॅच यांनी ‘त्रावणकोर : अ गाईड बुक फॉर व्हिजिटर’ या पुस्तकात लिहिले आहे की, 1931 मध्ये तळघराचे दार उघडण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा हजारो सर्पांनी तळघराला घेराव घातला होता. तत्पूर्वीही 1908 मध्ये असे घडलेले आहे.
सातव्या तळघराच्या दारावरील दोन सर्पांचे चित्र हे ‘नाग पाशम’ मंत्राने बांधले गेलेले असावे. तो पाश उघडायचा, तर त्यावर मात्रा म्हणून ‘गरुड मंत्रा’च्या जापाने हे दार उघडता येऊ शकेल; पण गरुड मंत्राचे उच्चारण अथवा विधीत जराही चूक झाली, तर मांत्रिकाचा जीव जाऊ शकतो, अशा आख्यायिका असल्याने हे दार उघडण्याची कुणीही हिंमत केलेली नाही वा करत नाही.
Post a Comment