राम मंदिराची भव्यता एक हजार वर्षे राहणार..!



माय अहमदनगर वेब टीम
अयोध्या - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  5 ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. 1989 मध्ये प्रस्तावित केलेल्या या मंदिराच्या आराखड्यात बदल करून ते आणखी भव्य बनविले जाणार आहे. सुरुवातीला नियोजित मंदिराच्या शिखराची उंची 128 फूट होती. मात्र, आता त्याची उंची 161 फूट करण्यात आली आहे. आता तीनऐवजी पाच घुमट आणि एक शिखर बांधण्यात येणार आहे. किमान एक हजार वर्षे मंदिराची भव्यता कायम राहील अशा पद्धतीने मंदिर परिसराच्या 67 एकरांपैकी दोन एकरांवर हे राम मंदिर बांधण्यात येणार आहे.

अयोध्येत मंदिराच्या भूमिपूजनाची जोरदार तयारी केली जात असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली आहे. या मंदिराचा आराखडा आर्किटेक्ट निखिल सोमपुरा यांनी तयार केला आहे. ते म्हणाले, साडेतीन वर्षांत मंदिर बांधण्याचे ट्रस्टच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही परिसराच्या सुशोभिकरणाचे काम सुरूच राहणार आहे. आमच्यावर केवळ मंदिर बांधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परिसर सुशोभिकरणाचे काम कोण करणार, हे ट्रस्ट ठरविणार आहे. तथापि, मंदिर परिसरात कोणत्या सुविधा असतील, याची नामावली ट्रस्टने तयार केली आहे. राम मंदिराचा आराखडा तयार असून, परिसराचा आराखडा तयार केला जात आहे.

देशातील हे सर्वात भव्य मंदिर आहे.  ते नियोजित साडेतीन वर्षांत पूर्ण करणे आमच्यासाठी मोठी कसोटी आहे. या मंदिराबाबत लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. हे लक्षात ठेवूनच आम्ही शक्य तितक्या लवकर मंदिराचे काम पूर्ण करणार आहोत. त्यामुळे सर्व काम प्रभू रामच आमच्याकडून करून घेणार असल्याचे निखिल सोमपुरा यांचे म्हणणे आहे. खजुराहोचे मंदिर 800 वर्षे जुने आहे. याच पद्धतीचे अनेक प्राचीन मंदिरे भारतात आहेत. त्याप्रमाणे 1 हजार वर्षे राम मंदिर सुस्थितीत राहील याची काळजी घेण्यात येणार आहे. कार्यशाळेत कोरलेल्या दगडांचा उपयोग मंदिरासाठी केला जाईल. याशिवाय भरपूर दगड लागणार आहेत. ते राजस्थानमधील बन्सीपूर, पहाडपूर येथून आणले जातील.

200 फूट खालील मातीचा नमुना घेतला

मंदिराला मजबुती देण्यासाठी पाया किती खोल आहे? आतील माती किती व कोणत्या प्रकारची आहे? ती किती वजन सहन करेल, याचा अभ्यास करावा लागतो. त्यानुसार राम मंदिराच्या उभारणीच्या ठिकाणी मातीचे 200 फूट खोल नमुने घेतले आहेत. माती परीक्षणाचा अहवाल आल्यानंतर पाया किती खोलवर काढायचा, याचा निर्णय एलएनटी घेईल, असे आर्किटेक्ट निखिल सोमपुरा यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post