नगर शहराबाहेर प्रशस्त एपीएमसी मार्केटची गरज



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कोणत्याही क्षेत्रात काळानुरुप बदल होत असतात. ते अंमलात आणले नाही तर प्रगती खुंटते. एकेकाळी महाराष्ट्रात सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख निर्माण करणार्‍या नगरच्या बाजारपेठेला अशा बदलाची प्रचंड गरज आहे. नगरचे एपीएमसी मार्केट दाळमंडई, आडतेबाजार, मार्केटयार्ड अशा भागात आहे. शहराच्या या भागात घर व दुकान अशी पारंपरिक रचना आहे. गेल्या कित्येक वर्षात यात बदल झालेला नाही.

आज या भागात माल आणणे व नंतर तो इतरत्र पाठवणे खूपच जिकिरीचे बनले आहे. वाहतूक कोंडी, अरूंद रस्ते यामुळे माल पुरवठादारही नगरला माल नेण्यापेक्षा पुण्याला, जालन्याला नेलेला बरा असे म्हणतात. त्याचा थेट परिणाम नगरच्या व्यापारावर होत आहे. त्यामुळे नगरच्या बाजारपेठेचा दिमाख पुन्हा अवतरण्यासाठी आणि शहराच्या विकासाला चालना मिळण्यासाठी नगर शहराबाहेर प्रशस्त एपीएमसी मार्केट उभारणे गरजेचे आहे. यासाठी व्यापारी बंधू, प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन नगरमधील युवा व्यापारींच्या व्यापारी युवा फोरमने केले आहे. नगरच्या व्यापार परिस्थितीबाबत युवा वर्गाने अभ्यास करून व्यापारवृद्धीबाबत मते मांडली आहेत.

सध्या व्यापार्‍यांची नवीन पिढीही शहरातील या नकारात्मक वातावरणाला कंटाळून पुण्यामुंबईची वाट धरुन चांगली नोकरी करण्यात धन्यता मानत आहे. ही बाब चिंताजनक वाटते. वास्तविक भौगोलिक परिस्थिती पाहिली तर नगरला एपीएमसी व्यापारात खूप संधी आहेत.

दुर्देवाने शहरातील बाजारपेठ मोेठी झाली नसल्याने आता तालुक्यातील व्यापारी थेट माल मागवतात. त्यामुळे नगरचा व्यापार कमी होत आहे. मराठवाड्यातील जालना शहर प्रशस्त एपीएमसी मार्केटमुळे मोठी बाजारपेठ बनले आहे. नगरमध्ये मागील काही वर्षात शहराबाहेर प्रशस्त एपीएमसी मार्केट बनविण्याचा विचार सुरु आहे.

मात्र ते प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही. मार्केट शहराबाहेर प्रशस्त जागेत गेल्यास मालाची आवक जावक जलद गतीने होवू शकते. मार्केट परिसरात रोजगारवृध्दी होवू शकते, बँकांच्या शाखा सुरु होवून अर्थकारणालाही गती येवू शकते. यासाठी व्यापार्‍यांनीच एकत्रितपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे. व्यापारात उठाव दिसल्यास नवीन पिढीही या व्यवसायाकडे वळू शकेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post