नेपाळच्या पंतप्रधानांचे भवितव्य सोमवारी ठरणार


माय अहमदनगर वेब टीम
काठमांडू - चीनच्या दबावामुळे भारताशी वैर ओढवून घेणारे नेपाळचे पंतप्रधान के. पी. एस. शर्मा ओली यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय दोन दिवस लांबणीवर पडला आहे. त्यांचा राजीनामा मागण्याबाबत शनिवारी होऊ घातलेली बैठक सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

सत्तारूढ आघाडीतील घटक पक्षांना विश्वासात न घेता काम करण्याची पद्धती आणि भारतविरोधी वक्तव्ये यामुळे फक्त सत्तारूढ घटक पक्षच नव्हे, तर नेपाळमधील विरोधकही पंतप्रधान ओली यांच्यावर संतापले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत घटक पक्षांनी ओली यांना थेट राजीनामा मागितला होता. या पार्श्‍वभूमीवर नेपाळ कम्युनिस्ट पार्टीच्या 45 सदस्यीय स्थायी समितीची शनिवारी सकाळी अकरा वाजता बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, शेवटच्या क्षणाला ती लांबणीवर टाकण्यात आली आहे.

पंतप्रधान ओली यांना आपल्या चुका दुरुस्त करण्यासाठी तसेच भारतविरोधी भूमिकेत बदल करणे शक्य व्हावे, यासाठी दोन दिवसांचा वेळ देण्यात आला असल्याचे मत ओली यांचे माध्यम सल्लागार सूर्या थापा यांनी व्यक्त केले आहे.

काही विषय अतिशय महत्त्वाचे, तर काही विषय संवेदनशील आहेत. त्यावर शांततेत तोडगा काढण्याची गरज आहे आणि त्यासाठी वेळ मिळणे आवश्यक आहे. आता दोन दिवसांचा वेळ मिळाला असल्याने, सोमवारच्या बैठकीत नक्कीच सकारात्मक निर्णय होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post