आता ‘कोरोना’ रुग्णांवर श्रीरामपूरातही केले जाणार उपचार



माय अहमदनगर वेब टीम
श्रीरामपूर – कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर या रुग्णांवर आता श्रीरामपुरात उपचार केले जाणार आहेत. यासाठी येथील संतलुक रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी काही रुग्णांवर उपचारही सुरु करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.

याअगोदर संशयित रुग्ण आढळला तर त्याचे स्त्राव तपासणीसाठी व कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्यावर उपचार करण्यासाठी नगर जिल्हा रुग्णालयात जावे लागत असे. त्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होत होता. त्यासाठी श्रीरामपूर येथे प्रांताधिकारी, तहसीलदार व काही वैद्यकीय अधिकार्‍यांची बैठक घेवून याठिकाणी या रुग्णावर उपचार करण्यासाठी कोविड केंद्र सुरु करण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार येथील संत लुक (जर्मन) रुग्णालयात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. वसंतराव जमधडे यांच्या नेतृत्वाखाली उपचार केले जाणार आहेत.

या रुग्णासाठी सध्या १० बेडची व्यवस्था करण्यात आली असून खास आयसीयुची व्यवस्था आहे. आणखी रुग्ण संख्या वाढली तर या रुग्णालयातील आणखी काही भाग करोना रुग्णासाठी राखीव केला जाणार असल्याची माहिती डॉ. जमधडे यांनी दिली. तसेच या ठिकाणी करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध असून सर्व साहित्य तसेच मेडिकल सुविधाही उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. आज या ठिकाणी पाच करोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. ग्रामीण रुग्णालयात स्त्राव घेतले जात असून अहवाल येईपर्यंत ग्रामीण रुग्णालयात संशयितांना ठेवले जाते.

श्रीरामपुरात कोरोना रुग्णांसाठी अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. तरीही नारिकांनी शासकीय नियमांचे पालन करुन या आजाराला रोखण्यासाठी सहकार्य करावे. नेहमीच मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सींग ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे, व स्वच्छता ठेवणे असे नियम कायम पाळावेत, असे आवाहनही तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.

याठिकाणी जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी, संतलुक हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी व स्टाफ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व स्टाफ तसेच इंडियन मेडिकलचे डॉ. प्रदीप टिळेकर, डॉ. विनायक मोरगे, डॉ. संजय शुक्ला, डॉ. रश्मी पराग तुपे, डॉ. अक्षय दिलीप शिरसाठ ही टीम या ठिकाणी रुग्णावर उपचार करणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post