मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ वेबपोर्टलचे लोकार्पण



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे आज (दि.६ जुलै) दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित होते.

टाळेबंदीनंतर राज्यात सध्या ६५ हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतेच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे १७ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याखेरीज नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महापरवाना देणे सुरू केले आहे. अशा स्थितीत उद्योगांत कुशल, अर्धकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. मध्यंतरी करोना संसर्गामुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. हे कामगार परत कधी येतील, याची निश्चिती नाही, त्यामुळे उद्योगांना कामगाराचा तुटवडा भासू नये, तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी ‘महाजॉब्स’ हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. याकामी उद्योग, कामगार व कौशल्य विकास विभागाच्या सूचना महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.

रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी केवळ आपली माहिती महाजॉब्स पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे अथक प्रयत्न व मार्गदर्शनाखाली अत्यल्प वेळेत हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे स्थानिक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post