'या' कारणांसाठी पावसाळ्यात हे पदार्थ मुळीच खाऊ नका


माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क -  पावसाळा आला की त्या पाठोपाठ काही व्हायरल आजारही पाठी लागतात. पावसात मनसोक्त भिजणं, उघड्यावरचे गरमागरम पदार्थ खाणं कितीही मस्त वाटत असलं तरी ते हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे पावसाळ्याचा आनंद लुटताना काही बाबत सावध राहणं फार गरजेचं आहे. या दिवसात सर्दी, खोकला, ताप, डायरिया, काविळ अशा आजारांची साथ पसरत असते. हे आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्यांचा प्रसार त्वरीत होतो. यासाठीच उघड्यावरचे काही पदार्थ कमीतकमी या दिवसात तरी खाणं टाळणं योग्य ठरेल. त्याऐवजी घरी तयार केलेले पौष्टिक पदार्थ खाण्याची सवय लावा. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती नक्कीच वाढेल.

पावसाळ्यात कोणते पदार्थ खाणे टाळावे -

पाणी -

पावसाळ्यात बाहेरचे उघड्यावरचे पाणी कधीच पिऊ नये. पावसाळ्यात पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित होत असते. शिवाय त्यामधून विविध आजार पसरू शकतात. काविळ, डायरिया हे आजार दूषित पाण्यामधून होऊ शकतात. यासाठीच पावसाळ्यात घराबाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत जरूर ठेवा.

फळे आणि फळांचा रस-

आजकाल उघड्यावर अनेक ठिकाणी फळे आणि फळांचे रस विकले जातात. हे ज्यूस तयार करण्यासाठी साध्या पाण्याचा वापर केला जातो. लिंबू पाणी अथवा इतर फळांच्या रसामधून तुम्हाला पोटाचे इनफेक्शन होऊ शकते. यासाठी या दिवसात बाहेरचे फळांचे रस मुळीच पिऊ नका. त्याऐवजी घरीच फळे आणून रस तयार करा.

पालेभाज्या -

पालेभाज्या आरोग्यासाठी अगदी उत्तम असतात. पावसाळ्यात मात्र पालेभाज्या न खाण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यात विकल्या जाणाऱ्या पालेभाज्या ओल्या झालेल्या, चिखलाने माखलेल्या आणि रस्त्यावरील पाण्याने धुतलेल्या असू शकतात. ज्यामधून तुम्हाला इनफेक्शन होण्याचा धोका असतो. यासाठीच अशा पालेभाज्या पावसाळ्यापुरत्या न खाणंच योग्य ठरेल. त्याऐवजी एखाद्या गावठाण भागातून आलेल्या रानभाज्या जरूर खा. कारण त्या नैसर्गिक पद्धतीने उगवतात आणि फक्त पावसातच उपलब्ध असतात.

मासे -

पावसाळ्यात मांसाहारी लोकांच्या घरी नॉन-व्हेज जेवणाचा बेत नक्कीच ठरतो. मात्र जर पावसाळ्यात तुम्ही मासे खाण्याचा बेत ठरवणार असाल तर जरा सावध रहा. कारण  पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. शिवाय समुद्राला उधाण येत असल्यामुळे या काळात मासेमारी बंद असते. त्यामुळे पावसाळ्यात ताजे मासे मिळत नाहीत. बर्फात साठवून ठेवलेले मासे चवीला चांगले लागत नाहीत. शिवाय ते आरोग्यासाठीदेखील योग्य नसतात. त्याऐवजी या दिवसात तुम्ही इतर नॉन-व्हेज पदार्थांचा बेत नक्कीच आखू शकता.

रस्त्यावरील फास्टफूड-

अनेकांना स्ट्रीट फूड खाण्याची आवड असते.  आजकाल सोशल मीडियावरदेखील स्ट्रीट फूडचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र तुम्ही पावसात भिजल्यावर अशा प्रकारचे स्ट्रीट फूड खाणार असाल तर त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. कारण या दिवसात पचनशक्ती कमकुवत झालेली असते. ज्यामुळे असे पदार्थ पचण्यास कठीण जातात. यासाठीच अशा पदार्थांपासून पावसाळ्यात दूरच रहा.

तळलेले पदार्थ -

पावसाळ्यात चहा आणि गरमागरम भजी खाण्याची मौजच न्यारी आहे. मात्र जर तुम्हील उघड्यावर तळलेली भजी  खाणार असाल तर मात्र सावध रहा. तळलेले पदार्थ पचण्यासाठी जड असतात. पावसातील वातावरणामुळे तुमच्या पचनशक्तीमध्ये बदल होत असतो. त्यामुळे बाहेरची, उघड्यावरची भजी अथवा तळलेले पदार्थ खाणे नक्कीच टाळा. त्याऐवजी घरी तयार केलेली भजी खाण्यास काहीच हरकत नाही. मात्र घरी देखील वारंवार तळलेले पदार्थ खाऊ नका. कारण ते तुमच्या आरोग्यासाठी मुळीच हितकारक नाही.

चाट फूड-

पाणीपुरी तर सर्वांचाच आवडता पदार्थ असतो. मात्र रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या पाण्यात पाणीपुरीत दूषित पाणी वापरले जाऊ शकते. यासाठी पावसाळ्यात रस्त्यावर विकली जाणारी पाणीपुरी मुळीच खाऊ नका.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post