नागरिकांना डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनशिवाय चाचणी करता येणारमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कोविड-19 च्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून कोविड -19 चाचणी प्रयोगशाळांमध्ये जलद गतीने चाचणी व प्रयोगशाळांचा पूर्ण क्षमतेने वापर केल्यास बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करता येतील. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोविड-19 चाचणी प्रयोगशाळा व वैद्यकीय व्यवसायिकांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. त्यानुसार, आता कोविड-१९ च्या तपासणीसाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता लागणार नाही, तसेच लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी घेतल्यानंतर रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता असणार नाही, मात्र, त्यांनी घरातच विलगीकरण करणे आवश्यक राहणार आहे.

                कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचलले असून यामुळे अधिकाधिक चाचण्या होऊ शकणार आहेत.  

            यासंदर्भात अहमदनगर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालय/ प्रयोगशाळा यांना कोविड -19  च्या अनुषंगाने नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणे कामी  खालील सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसारस आयसीएमआर मान्यताप्राप्त खाजगी प्रयोगशाळेत कोविड-19 तपासणीसाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता असणार नाही. संबंधित प्रयोगशाळांना स्वॅब घेतलेल्या व्यक्तींची माहिती तसेच कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती व अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक, अहमदनगर व जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, अहमदनगर यांना दररोज कळविणे बंधनकारक असणार आहे. तसेच संबंधित माहिती आरटीपीसीआर अॅपवर टाकणे बंधनकारक राहील. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना कोविड-19 लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची तपासणी करावयाची असल्यास स्वॅब घेतल्यानंतर रुग्णालयात भरती करणे आवश्यक राहील. लक्षणे नसणाऱ्या व्यक्ती / कोविड-19 पॉझिटिव्ह सहवासीत व्यक्ती / शस्त्रक्रिया पूर्व खाजगी प्रयोगशाळेत कोविड-19 तपासणी करावयाची असल्यास संबंधितांना स्वॅब घेतल्यानंतर रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता असणार नाही. तथापि सदर व्यक्ती यांना अहवाल प्राप्त होईपर्यंत होम क्वारंटाईन राहणे आवश्‍यक राहील. संबंधित खाजगी प्रयोग शाळांनी क्वारंटाईन शिक्का त्यांचे हातावर मारणे बंधनकारक राहील. कोविड-19 अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची माहिती तातडीने निकटचे शासकीय रुग्णालयांना कळविणे तसेच त्यांना शासकीय आयसोलेशन इन्स्टिट्यूट मध्ये भरती होणे बंधनकारक राहील.

                कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता  (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनीय/ कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.  

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post