चष्म्याला चाळीशी का म्हणतात?


माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - चष्म्याचा उल्लेख ‘चाळीशी’ असा केलेला तुम्ही ऐकले असेल. तुमच्या नात्यातील काका, मामा, मावशी यांना वयाच्या चाळीसाव्या आसपासच चष्मा लागला; हे तुम्ही बघितले असेल. असे का होते, ते आता पाहू. लहान मुलांनाही चष्मा लागतो; पण त्यांना सामान्यतः जवळचे नीट दिसते पण लांबचे दिसत नाही. याला दूरदृष्टी दोष असे म्हणतात. दृष्टिदोष का निर्माण होतात ते कळण्यासाठी डोळ्याची माहिती घेणे अगत्याचे ठरेल.

प्रकाशकिरण बुबुळातून शिरून; भिंग, नेत्रमगज इत्यादीमधून दृष्टीपटलापर्यंत पोचून स्पष्ट प्रतिमा पडणे हे चांगल्या दृष्टीसाठी आवश्यक असते. प्रकाशाच्या मार्गात काही अडथळे येणे (जसे फूल पडणे, मोतीबिंदू इ.) किंवा प्रतिमा स्पष्ट न पडणे हे दृष्टिदोषांचे कारण असते. डोळ्यातील भिंग हे काचेच्या भिंगासारखे नसते. हे भिंग आपली वक्रता कमी जास्त करू शकते. त्यामुळे वेगवेगळ्या अंतरावरील वस्तूंची प्रतिमा बरोबर दृष्टीपटलावरच पडते.

वार्धक्यामुळे नेत्रभिंगांची लवचिकता कमी होते, त्यामुळे जवळच्या वस्तूंच्या प्रतिमा दृष्टीपटलावर स्पष्टपणे पडत नाहीत आणि जवळचे दिसायला त्रास होतो. त्यामुळेच चष्मा लावावा लागतो. चष्मा लावल्याने जवळच्या वस्तू नीट दिसायला लागतात. साधारणतः चाळीशीनंतर भिंगात हे बदल घडायला लागतात आणि त्यामुळे चाळीशीनंतर चष्मे वापरावे लागतात! त्यामुळेच चष्म्याला चाळीशी म्हटले जाते.

अर्थात काही जणांना आयुष्यभर चष्मा लागत नाही तर काहींना वयाच्या 30 व्या वर्षीच लागतो; पण सर्वसाधारणपणे जवळचे कमी दिसण्याचा त्रास चाळीशीनंतर भिंगाचा लवचिकपणा कमी झाल्याने होतो आणि मग चाळीशी वापरावी लागते!

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post