सर्वसामान्य जनतेच्या मनात मीच आमदार ; कर्डिलेचा दावा


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - मागील २५ वर्षे कामाची पावती म्हणून मला जनतेने आमदारकी बहाल केली होती. आता जरी विधानसभेचा आमदार नसलो तरी सर्वसामान्य जनतेच्या मनात मी आमदार राहिल्याने विकासकामे करणे, हे कर्तव्य समजून हे विकास पर्व सुरूच राहील, असे प्रतिपादन राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले. पाच वर्षांपूर्वी राज्यात भाजपचे सरकार आल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळी भाजपच्या युवा नेत्या पंकजाताई मुंडे याही या पदाच्या शर्यतीत होत्या. मात्र, त्यांची निवड झाली नाही. पण त्या काळात त्यांनी आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे केलेले वक्तव्य गाजले होते. या पार्श्वभूमीवर माजी आमदार कर्डिलेंनीही आता आपण जनतेच्या मनातील आमदार असल्याचे वक्तव्य केल्याने तो चर्चेचा विषय होऊ लागला आहे.

गेली २५ वर्षे जनतेने मला जेवढे प्रेम दिले, त्या जनतेच्या पाठिंब्यावरच मंत्रीपद मिळाले होते. त्याचा उपयोग मी जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी केला, आजही जनतेचा मनात आमदार म्हणून कार्यरत आहे. राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघातील सर्वसामान्य लोक माझ्याकडे आपले  प्रश्‍न घेऊन येतात व ते सोडविल्यामुळे त्यांच्या मनात मी माजी आमदार म्हणून नव्हे तर आमदार म्हणूनच मला ओळख देतात, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा समजतो, असेही कर्डिले यांनी आवर्जून स्पष्ट केले.

बुर्‍हाणनगर ग्रामपंचायतीच्यावतीने कचरा गोळा करण्यासाठी नवीन घंटागाडी घेण्यात आली असून, तिचे उदघाटन कर्डिले यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी ते बोलत होते. बुर्‍हाणनगरचे उपसरपंच बाळासाहेब कर्डिले, राजाराम कर्डिले, श्रीधर पानसरे, रावसाहेब कर्डिले, तात्या कर्डिले, किशोर कर्डिले, तसेच मनपाचे नगरसेवक सुनील त्र्यंबके, विनित पाउलबुद्धे, बाळासाहेब पवार, शिवाजी पालवे, डॉ.दरंदले, रामदास काकडे उपस्थित होते.

कर्डिले पुढे म्हणाले, बुर्‍हाणनगरचा सरपंच असल्यापासून लोकांचे प्रश्‍न सोडविणे तसेच गावाचा व परिसराचा विकास करण्याचे ध्येय ठेवून त्याची पूर्तता केल्याने सर्वसामान्य जनतेने २५ वर्षे आमदारकी दिली. बुर्‍हाणनगर ग्रामपंचायत हद्दीतील वाढती उपनगरे लक्षात घेऊनच या परिसरातील पाणी, रस्ते, विजेचे प्रश्‍न सोडविले. आता स्वच्छ भारत-समृद्ध भारत करण्यासाठी कचरा संकलनासाठी घंटागाडी सुरू केली आहे. लोकांनी त्याचा उपयोग करावा. घर जसे स्वच्छ ठेवता, तसा परिसर स्वच्छ ठेवा. लवकरच ज्या भागात ड्रेनेजचा प्रश्‍न राहिला आहे, तो सोडविण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. यावेळी अमोल धाडगे, सचिन फाळके, सोमनाथ नजन, देशमाने, कांडेकर, टकले, राऊत, झिने तसेच गजराजनगर, तपोवनरोड, साईनगर, शिवाजीनगर उपनगरातील नागरिक, महिला उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post