आज राज्यव्यापी दूध आंदोलन


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर 10 रुपये अनुदान द्यावे व ते थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रतिकिलो 50 रुपये अनुदान द्यावे तसेच गायीच्या दुधाला 30 रुपये दर द्यावा, या मागण्यांसाठी महायुती आंदोलन करणार आहे. सोमवारी राज्यभर सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदनासह दुधाच्या पिशव्या भेट देणे, असे आंदोलनाचे स्वरूप आहे.
दूध उत्पादकांच्या प्रश्नांबाबत महायुतीतील घटक पक्षांची रविवारी बैठक झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे आ. सदाभाऊ खोत, शिवसंग्राम संघटनेचे आ. विनायक मेटे आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अविनाश महातेकर व भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर व चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष अनिल बोंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित होते.

दुधाचे भाव लिटरमागे 16 ते 18 रुपयांपर्यंत घसरले आहेत. कोरोना संकटामुळे दूध संकलन होत नसल्यामुळे दूध उत्पादकांचे नुकसान होत आहे. त्यांना दुधाचा योग्य दर मिळत नाही. राज्य सरकारने घेतलेले निर्णय हे ठराविक दूध संघांपुरतेच  मर्यादित असून, राज्यभरातील अन्य दूध उत्पादकांवर अन्याय होत आहे, अशा भावना महायुतीतील घटक पक्षांनी व्यक्त केल्या. या आंदोलनातून  जर काही निष्पन्न झाले नाही, तर एक ऑगस्टला मोठे आंदोलन उभे करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post