एकाचे प्रेम, दुसर्‍याचा लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने तरूणीची बदनामी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - एका तरुणाच्या प्रेमाला नकार दिला. तर, दुसर्‍यासोबत प्रेम असून लग्न करण्यास नकार दिल्याने दोघा तरूणांनी मिळून तरुणीची सोशल मीडियावर बदनामी केली. ज्याला प्रेमासाठी नाकारले त्याने संबंधित तरुणीचे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार केले. त्या बनावट अकाऊंटच्या आधारे तरुणीची बदनामी केली. दुसर्‍या बरोबर प्रेम होते, परंतु, त्या तरुणाची इच्छा असून तरुणीने लग्नास नकार दिल्याने त्याने तिला व्हाट्सअपवर मेसेज करून व फोन करून त्रास दिला.

संगमनेर तालुक्यातील या घटनेत सायबर पोलिसांनी संकेत नानासाहेब गाडेकर (रा. राजापूर ता. संगमनेर), तेजस कैलास ससकर (रा. गोल्डन सिटी, संगमनेर) यांना अटक केली. जानेवारीमध्ये संगमनेर तालुक्यातील एका तरूणीने नगर सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मला दोन तरुणांपासून त्रास होत असल्याचे व माझे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून बदनामी केली जात असल्याचे फिर्यादीत म्हटले होते. सायबर पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला.

संकेत गाडेकर याने फिर्यादी तरुणीला काही दिवसांपूर्वी प्रेमाचा प्रस्ताव दिला होता. त्यास तरूणीने नकार दिला होता. तेव्हापासून संकेतच्या मनामध्ये तिच्याविषयी राग होता. त्याने संबंधित तरुणीचे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार केले होते. या अकाउंटवर संबंधित तरुणीचे फोटो अपलोड करून तिच्या ओळखीच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्या होत्या. काही मित्रांसोबत चॅटिंग करून तरुणीची बदनामी केली गेली.

दुसरा तरूण तेजस ससकर याचे तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांच्या सहमतीने ते काही दिवस एकत्रही राहिले. तेजसची इच्छा लग्न करायची होती. परंतु, तिने लग्न करण्यास नकार दिला. याचा राग तेजसला होता. प्रेमसंबंध असताना काढलेले फोटो त्याने सोशल मीडियावर बदनामी करण्यासाठी टाकले होते. तेजस तरुणीला व्हाट्सअपवर मेसेज आणि फोन करून नेहमी त्रास देत होता. यामुळे तरुणी दडपणाखाली होती.

दरम्यानच्या काळात संबंधित तरुणीने दुसर्‍या व्यक्तीसोबत लग्न केले. लग्न झाले तरी तिची बदनामी आरोपी थांबविण्याचे नाव घेत नव्हते. त्यामुळे तरुणीने सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. या प्रकरणाचा छडा पोलीस निरीक्षक अरुण परदेशी, उपनिरीक्षक प्रतिक कोळी, पोलीस शिपाई अभिजित आरकल, राहुल गुंडू, सम्राट गायकवाड, अमोल गायकवाड, भगवान कोंडार, वासुदेव शेलार यांच्या पथकाने लावला.

संशयाचे रूपांतर वादात
संकेत गाडेकरच्या प्रेमाला फिर्यादी तरूणीने नकार दिला. नंतर ही तरूणी तेजस ससकरच्या प्रेमात पडली. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. काही दिवस सुरळीत चालू होते. परंतु, तेजस तिच्यावर वेगवेगळे संशय घेत असे. त्याच्या म्हणण्यानुसार ऐकणे तरूणीला बंधनकारक होते. यामुळे त्यांच्यात वाद होत गेले. तेजसची लग्न करण्याची इच्छा असूनही त्या तरूणीने लग्न करण्यास नकार दिला. यामुळे तेजसने तरूणीला त्रास देण्यास सुरुवात केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post