सध्याचे सरकार तीन तीगाडा... काम बिगाडा सरकार : मंत्री रावसाहेब दानवे


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच देशात लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने लोकसंख्येने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा असलेल्या आपल्या देशात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आहे. त्यामुळे जगात मोदींचे नाव घेतले जात असून कौतुक केले जात आहे. असे असतांनाही राज्यातील सत्ताधारी नेते मात्र मोदींवर टीका करत आहेत. संपूर्ण देशात केंद्र सरकाने तातडीने कोट्यावधी रुपयांचे अनुदान पाठवून करोनाच्या या संकटात मदत कार्य सुरु केले. मात्र राज्य सरकाने स्वतःच्या तिजोरीतून किती रुपयांचे अनुदान देऊ जनतेला मदत केली हे जाहीर करावे. आज राज्यात जे मदत कार्य चालू आहे ते फक्त आणि फक्त केंद्र सरकार कडून आलेल्या अनुदानातूनच चालू आहे. पंतप्रधानांनी या संकट काळात सर्व स्तरातील जनतेसाठी जाहीर केलेल्या कोट्यावधी रुपयांचे पॅकेजमुळे मोठा आधार जनतेला मिळाला आहे. मात्र राज्य सरकार राज्यातील जनतेसाठी काहीही करत नाहीये. राज्यातील हे तीन पक्षांचे सरकार म्हणजे तीन तीगाडा... काम बिगाडा..., कोणाचाच कोणाला मेळ नसलेले हे अमर, अकबर,अँथनी आहेत, अशी उपहासात्मक टीका केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर केली.

मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज नगरला धावती भेट दिली. माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निवास्थानी ते थांबले होते. यावेळी मंत्री दानवे यांनी गांधींच्या निवास्थानाहून पुण्याच्या भाजपच्या महिला आघाडीच्या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मार्गदर्शन केले. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर ते प्रथमच नगरला आल्याबद्दल त्यांचे दिलीप गांधी व सुवेंद्र गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, चेतन जग्गी, सागर गोरे, देवेंद्र गांधी, भरत ठुबे आदि मोजके कार्यकर्ते उपस्थित होते.

नगरला आल्यावर दिलीप गांधी हे माझे कायमच उत्साहात व आदराने स्वागत करतात, असेही मंत्री दानवे यावेळी म्हणाले. रावसाहेब दानवे यांनी कायमच नगरच्या भाजपावर प्रेम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर जिल्हाध्यक्ष असतांना भरपूर काम करण्याची संधी मला मिळाली, असे यावेळी दिलीप गांधी यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post