अलिबाग किनाऱ्यावर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा धोका
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर दिसण्यास सुरुवात झाली आहे. काही तासांमध्ये हे वादळ रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात वारा आणि पावसाचा जोर वाढला असून १२ हजार लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रिवादळाची रायगडच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे, अलिबाग पासून १४० किलोमिटर अंतरावर सध्या हे वादळ आहे. पुढील तीन ते चार तासात हे वादळ अलिबाग जवळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळत आहे. वाऱ्यांचा वेगही वाढला आहे. अनेक ठिकाणचा विद्यूत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरण या चार सागरी तालुक्यांना वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे १२ हजार लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. यात अलिबाग तालुक्यातील ४ हजार ४०७, पेण मधील ८७, मुरुड मधील २४०७, उरण मधील १५१२, श्रीवर्धन मधील २५५३ म्हसळ्यातील २३९ लोकांचा समावेश आहे. अलिबाग, थळ, नवगाव येथील कोळीवाड्यातून नागरीकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याच्या सुचना दिल्या जात आहेत.
वादळाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात ६ बचाव पथकं तैनात करण्यात आली आहे. यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पाच तर तटरक्षक दलाच्या एका पथकाचा समावेश आहे. याशिवाय नागरी सुरक्षा बलाचे एक पथकही तैनात करण्यात आले आहे. मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली असून समुद्र किनाऱ्यावर नागरीकांनी जाऊ नये अशा सुचना दिला जात आहेत. जिल्ह्यात २४ तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Post a Comment