गोपनीय भेटीगाठी, वक्तव्यांमुळे राजकीय अस्थैर्याचा ‘कल्लोळ’, काँग्रेस ‘डिसिजन मेकर’ नाही, राहुल गांधींची भरमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई -  राजकीय भेटीगाठी आणि दाव्या-प्रतिदाव्यांमुळे मंगळवारी दिवसभर राज्यातील राजकीय वातावरण अचानक तापले. महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर सायंकाळी थेट ‘मातोश्री’ गाठून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. पवारांनी ‘मातोश्री’वर गोपनीय भेट घेतल्याचे वृत्त उघड होताच ठाकरे सरकार अस्थिर असल्याचे व कोरोना अपयशाचा ठपका ठेवून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या शक्यतेपर्यंत तर्कवितर्कांना उधाण आले.
इकडे, महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा आहे, असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले. तर दुसरीकडे दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील सरकारमध्ये काँग्रेस ‘डिसिजन मेकर’ नाही, असे वक्तव्य करून या गोंधळात आणखी भर टाकली. दरम्यान, कोरोना रोखण्यात अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारने ‘अस्थिर’ असल्याचा कांगावा सुुरू केला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
नाना पटोले दिल्लीत
: विधानसभेचे अध्यक्ष व विदर्भातील काँग्रेस नेते नाना पटोले मंगळवारी दुपारी दिल्लीला गेले. पटोले तडकाफडकी दिल्लीला का गेले, यासंदर्भात शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.
भाजपतील असंतुष्टांच्या अफवा : थोरात
कोरोनाच्या निमित्ताने भाजपची असंतुष्ट मंडळी सरकार अस्थिर असल्याच्या अफवा पसरवत आहेत. सरकारमधील तिन्ही पक्षांत पुरेसा समन्वय आहे. काही धुसफूस नाही. राष्ट्रपती राजवटीची चर्चा केवळ प्रसिद्धिमाध्यमांत आहे. भाजपने चालवलेल्या सरकार पाडण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना यश येणार नाही,’ असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात यांनी केला.
मी स्वत:च सांगून ‘मातोश्री’वर गेलो, सरकार स्थिर : शरद पवार
राज्यातील स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही दादर येथील बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे भेटून चर्चा करीत असतो, परंतु मी स्वतःच उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर चर्चेसाठी येत आहे असे सांगितले आणि गेलो. संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कोरोनाशी लढा देण्याच्या उपाययोजनांवर आम्ही चर्चा केली, रुग्णांची संख्या का वाढत आहे, आता पावसाळा येणार असल्याने काय काळजी घ्यावी यावर आम्ही चर्चा केली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
सरकार स्थापण्याची कोणतीही घाई नाही
सध्याची परिस्थिती पाहता महाविकास आघाडी सरकार पाडून आमचे सरकार स्थापन करण्याची आम्हाला कसलीही घाई नाही. हे सरकार स्वतःच्याच ओझ्याने पडणार आहे. सत्ताधाऱ्यांमध्येच समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे नेते एक तर राष्ट्रवादीचे नेते दुसरेच बोलतात, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्हीसीद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, मी उद्धव ठाकरे यांचे मूल्यमापन करण्यासाठी इथे बसलेलो नाही, तो माझा अधिकारही नाही. पण राज्याला सध्या एका आश्वासक नेतृत्वाची गरज आहे. आम्हाला त्यांच्याकडून ठोस निर्णयांची अपेक्षा आहे. राहुल यांचे वक्तव्य म्हणजे अपयशाचे खापर शिवसेनेवर फोडण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले
मोदीही पवारांचे मार्गदर्शन घेतात.. : संजय राऊत
शरद पवार यांच्या मातोश्रीवरील बैठकीवरून गदारोळ होण्याचे, आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. या बैठकीची माहिती माध्यमांना कळली नाही म्हणून ती गुप्त बैठक होती असे म्हटले जात आहे. विविध पक्षांचे नेतेच नव्हे तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीही शरद पवारांशी चर्चा करतात, मार्गदर्शन घेतात. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आम्ही मार्गदर्शन घेतले असेल तर वाईट वाटण्याचे कारण नाही, असे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले.
राहुल गांधींचे वक्तव्य योग्य : मलिक
ठाकरे सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे, पण मोठ्या निर्णयात महाराष्ट्रात काँग्रेसला स्थान नाही,’ असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्याने काँग्रेस अस्वस्थ असल्याबाबत शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, राहुल गांधी यांचे वक्तव्य योग्यच आहे, कारण महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार नाही तर महाविकास आघाडीचे सरकार आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post